“त्या” आठ जागांबाबत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काय आहे वाद ? वाचा महापॉलिटिक्सच खास रिपोर्ट

“त्या” आठ जागांबाबत काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये काय आहे वाद ? वाचा महापॉलिटिक्सच खास रिपोर्ट

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये जागावाटपाचं भिजत घोंगड सुटता सुटत नाही. 40 जागांचे जागावाटप पूर्ण झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र आठ जागांचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामध्ये पुणे, अहमदनगर, नंदूरबार, औरंगाबाद, यवतमाळ, रावेर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, मुंबईमधील एका जागेचा समावेश आहे. नेमका हा वाद काय आहे ते पाहूया.

पुण्याची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. पुण्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद काँग्रेसच्या तुलनेत अधिक आहे. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला हवी आहे. पण पुणे जिल्ह्यातील चार पैकी 3 जागा राष्ट्रवादी लढवत आहे. त्यामुळे पुण्याची जागा राष्ट्रवादीला दिली तर काँग्रेसला एकही जागा राहणार नाही. जिल्ह्यातील इतर एखादी जागा काँग्रेसने लढवावी इतपत त्या जागांवर पक्षाची ताकद नाही. त्यामुळे पुण्याची जागा राष्ट्रवादीला दिली तर पुणे जिल्ह्यातून काँग्रेसचे नामोनिशान जाईल याची भिती काँग्रेसला वाटत आहे. त्यामुळे ती जागा सोडायला काँग्रेस तयार नाही.

अहमदनगरची जागा आघाडीमध्ये राष्ट्रवादीकडे आहे. मात्र तिथून पक्षाला मागच्या दोन वेळेला अपयश आलं आहे. मतदारसंघात आमची ताकद जास्त आहे. त्यामुळे आम्ही ती जागा काँग्रेससाठी सोडणार नाही असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. तर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांच्यासाठी काँग्रेसला नगरची जागा हवी आहे. गेली दोन वर्ष सुजय विखे यांनी हा मतदारसंघ पिंजून काढला आहे. काँग्रेसचा तिकीट मिळालं तर ठिक अन्यथा अपक्ष किंवा इतर पक्षाकडून निवडणूक लढवू असं सुजय विखे सांगत आहेत. एक प्रकारचं आव्हान त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या हायकमांडला दिलं आहे. त्यामुळे तर राष्ट्रवादी अधिकच त्या जागेसाठी अडून बसल्याचं बोललं जातंय.

नंदूरबारची जागा आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. गेल्यावेळी मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे. विद्यमान खासदार हिना गावीत आणि त्यांचे वडील माजी मंत्री विजयकुमार गावित हे पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी नंदूरबारची जागा राष्ट्रवादीला हवी आहे. तर नंदूरबारची जागा ही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्ही ती सोडणार नाही असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे. तसंच स्थानिक पातळीवर गावित कुटुंबियांना काँग्रेस नेत्यांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे त्या जागेवर वाद संपत नाही.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला सातत्याने अपयश येत आहे. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीसाठी सोडावी अशी मागणी राष्ट्रवादीनं केली आहे. आमच्याकडे तगडा उमेदवार आहे असा राष्ट्रवादीचा दावा आहे. मराठवाडा पदवीधर मतदरासंघाचे आमदार सतिश चव्हाण यांच्यासाठी ती जागा राष्ट्रवादीला हवी आहे. मात्र ती सोडायला काँग्रेस तयार नाही. जळगाव जिल्ह्यातील रावेरची जागा राष्ट्रवादीकडं आहे. ती काँग्रेसला हवी आहे. सातत्याने तिथं राष्ट्रवादीचा पराभव झाला आहे. त्यामुळे ती जागा द्यावी अशी काँग्रेसची मागणी आहे. मात्र मतदारसंघात आमची ताकद जास्त असल्याचं सांगत राष्ट्रवादी ती जाग सोडायला तयार नाही.

नारायण राणे भाजपवर नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यातून त्यामुळे त्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. दोन्ही काँग्रेसची तादत त्या मतदारसंघात मर्यादित आहे. त्यामुळे राणेंना तिथून उभे करणयाचा शरद पवारांचा मानस आहे. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला हवी आहे. मात्र काँग्रेस राणेंना ती जागा सोडायला तयार नाही. मात्र आता नव्या घडामोडीत भाजपने राणेंचा समावेश पक्षाच्या केंद्रीय जाहीरनामा समितीमध्ये केला आहे. त्यामुळे आता राणे भाजपसोबत राहतील असं बोललं जातंय. त्यामुळे राष्ट्रवादी आता त्या जागेसाठी कितपत आग्रही राहिल ते पहावं लागेल.

यवमाळ- वाशिम मतदारसंघ आघाडीमध्ये काँग्रेसकडे आहे. मात्र त्या ठिकाणी काँग्रेसचा सातत्याने पराभव झाला आहे. त्यामुळे ती जागा राष्ट्रवादीला हवी आहे. कुणबी आणि बंजारा बहुल असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस ज्येष्ठ नेते मनोहर नाईक यांना रिंगणात उतरवण्याच्या तयारीत आहे. मात्र काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडायला तयार नाही.

मुंबईतील सहा पैकी मुंबई उत्तर पूर्व हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. राष्ट्रवादीला मुंबई आणखी एक जागा हवी आहे. मुंबई उत्तर मध्य किंवा मुंबई उत्तर पश्चिम या दोन पैकी एक जागा राष्ट्रवादीला हवी आहे. मात्र काँग्रेस कोणतीही जागा राष्ट्रवादीला सोडायला तयार नाही. दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीची फारशी ताकद नसल्याचं काँग्रेसचं म्हणणं आहे. त्यामुळे आता या आठ जागांचा तिढा दोन्ही पक्ष कसे सोडवतात ते पहावं लागेल. अन्यथा राहूल गांधी आणि शरद पवार यांच्या कोर्टात हा चेंडू जाऊ शकतो.

COMMENTS