काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले, लोकसभेत भाजपचा प्रचार केलेल्या आमदाराला मानाचे पान !

काँग्रेसने राष्ट्रवादीच्या जखमेवर मीठ चोळले, लोकसभेत भाजपचा प्रचार केलेल्या आमदाराला मानाचे पान !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी दोन्ही काँग्रेसनं काही अपवाद वगळता अत्यंत एकोप्याने काम केले होते. दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी तशी तंबीच स्थानिक नेत्यांना दिली होती. त्यामुळे कधी नव्हे तेवढा एकोपा दोन्ही काँग्रेसमध्ये दिसला होता. असं असलं तरी काही ठिकाणी छुप्या पद्धतीनं आणि काही ठिकाणी उघडपणे काही नेत्यांनी युतीच्या उमेदवाराला मदत केली.

त्यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात येणा-या माण खटाव विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार जयकुमार गोरे यांनी उघडपणे भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसची जिरवण्यासाठी आपण निंबाळकर यांना मदत करत असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं. काँग्रेसच्या काही नेत्यांनी गोरे यांना सांगूनही त्याचा फारसा उपयोग झाला नाही.

गोरे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीला लोकसभा निवडणुकीत चांगलाच फटका बसला. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही गोरे यांनी राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. त्यामुळे राष्ट्रवादीचा गोरे यांच्यावर राग आहे. असं असताना आज काँग्रेसने विधीमंडळातील नेमणुका केल्या. त्यामध्ये गोरे यांच्काडे पक्षप्रतोदाची जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे आता राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडं पहावं लागेल. दोन्ही पक्षात चांगलं वातावरण असताना या नव्या नेमणुकीमध्ये दोन्ही पक्षात वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

जयकुमार गोरे हे भाजपच्या वाटेवर असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. गोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या प्रवेशाला आणखीनच रंग आला होता. तरीही त्यांची प्रक्ष प्रतोदपदी नेमणुक करण्यात आली आहे. त्यातच दुसरीकडे विदर्भातील आमदार सुनिल केदार यांचीही प्रतोदपदी नेमणुक कऱण्यात आली आहे. तेही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा होत्या.

COMMENTS