महाशिवआघाडीचं अखेर ठरलं, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘या’ मुद्यांवर एकमत?

महाशिवआघाडीचं अखेर ठरलं, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ‘या’ मुद्यांवर एकमत?

नवी दिल्ली – राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेला आघाडीत घेण्याबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी हिरवा कंदिल दाखवला असल्याची माहिती आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या 6 जनपथ या निवासस्थानी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, अहमद पटेल, प्रफुल पटेल, सुप्रिया सुळे यांच्यासह दोनही पक्षांचे मिळून 15 नेते उपस्थित होते. या बैठकीत शिवसनेसोबत एकत्र येण्यासाठी किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेनेसारख्या वैचारिक विरोधकासोबत एकत्र येण्यासाठी समान कार्यक्रमाची गरज आहे. त्यामुळे इतर वादग्रस्त मुद्दे बाजूला पडतील असं काँग्रेसला वाटतंय. त्यामुळे पहिल्यांदा समान किमान कार्यक्रम तयार करण्यावर सर्वांचं एकमत झालं असल्याची माहिती आहे.

दरम्यान या बैठकीत शिवसेनेची प्रतिमा आणि त्यांचे आग्रक्रमावर असलेले सर्व वादग्रस्त मुद्दे या किमान समान कार्यक्रमांमधून वगळण्यात येणार आहेत. तसेच कुठेही जातीय आणि धार्मिक अजेंडा वर येणार नाही याचं शिवसेनेकडून आश्वासन घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.

बैठकीत या मुद्यांवर एकमत

1) रोजगार वाढीला चालणा देण्यासाठी खास कार्यक्रम राबविण्यावर एकमत.

2) अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी खास उपाययोजना करणार. अवास्तव खर्चाला कात्री लावण्या येणार.

3) कोरडा आणि नंतर ओल्या दुष्काळात भरडल्या गेलेल्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा करणार.

4) उद्धव ठाकरे यांनी घोषणा केलेली 10 रुपयांमध्ये थाळी ही योजनाही किमान समान कार्यक्रमाचा भाग असणार.

5) पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना वेग देत विकासाची गती कायम राखणार.

6) शेतकरी, शेतमजूर आणि तळातला माणूस हा नव्या सरकारचा केंद्रबिंदू असणार.

COMMENTS