लोकसभेतील पराभवानंतर आघाडीच्या नेत्यांची धनंजय मुंडेंच्या घरी बैठक !

लोकसभेतील पराभवानंतर आघाडीच्या नेत्यांची धनंजय मुंडेंच्या घरी बैठक !

मुंबई – लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या घरी उद्या ही बैठक होणार आहे.या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, जयंत पाटील, धनंजय मुंडे, राजू शेट्टी उपस्थित राहणार आहेत. राज्यातील युतीकडून झालेल्या पराभवानंतर आघाडीची ही आढावा बैठक असणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे लक्ष लागलं आहे.

दरम्यान या बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक बोलावली आहे. 1 जून रोजी ही बैठक पार पडणार असून यशवंतराव चव्हाण भवनात सकाळी बैठकीचं आयोजन केलं आहे. ही बैठक सकाळच्या सत्रात पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांसोबत तर दुपारच्या सत्रात आमदार-खासदारांसोबत पार पडणार आहे त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला अपेक्षित यश मिळालं नाही. पक्षाला अवघ्या
4 जागा मिळाल्या आहेत. तर अमरावतीत राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार नवनीत कौर राणा यांनी विजय मिळवला. तर काँग्रेसला फक्त एका जागेवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत झालेल्या चुका कशा टाळता येतील, यावर या बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळालं नाही. त्यामुळे निकालानंतर शरद पवारांनी इन्स्टाग्रामवर ‘जिंकलो नसलो तरी हरलो नाही’ या आशयाची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांना न खचण्याचं आवाहन केलं होतं. तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी देखील अपयशामुळे खचून जाऊ नका असं आवाहन कार्यकर्त्यांना केलं होतं.

COMMENTS