काँग्रेस – राष्ट्रवादीची जागा वाटपाची पहिली बैठक संपली, राष्ट्रवादीने ‘एवढ्या’ जागांचा आग्रह धरला ?

काँग्रेस – राष्ट्रवादीची जागा वाटपाची पहिली बैठक संपली, राष्ट्रवादीने ‘एवढ्या’ जागांचा आग्रह धरला ?

मुंबई – काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची आज पहिली बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीत लढवण्यात येणाय्रा जागांबाबत प्राथमिक चर्चा करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आजच्या बैठकीत राष्ट्रवादीने 50 – 50 टक्के जागांचा आग्रह धरला असल्याची माहिती आहे. परंतु यावर या बैठकीत कोणताही निर्णय घेतला नसून आगामी बैठकीत सविस्तर चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे.

बैठकीनंतर काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या बैठकीत जागा वाटपाबाबत दोन्ही पक्षांच्या नेत्यांची प्राथमिक चर्चा झाली. बैठकीत फॉर्मुल्यावर कोणतीही चर्चा झाली नसून कोणाची ताकद किती हा विषय नाही. आघाडीचा मुख्यमंत्री बसवायचा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मित्रपक्षांना किती जागा द्यायच्या, कुणाला बरोबर घ्यायचं यावर पुढे निर्णय होईल. तसेच जिंकून येण्याचा निकष ठरवून जागा वाटप आणि उमेदवारी दिली जाणार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत.जागांची अदलाबदल करायची की नाही यावर लगेच चर्चा नाही. येणाऱ्या काळात मित्रपक्षांना बरोबर घेऊन जागावाटपाबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच ज्याला जिंकण्याची क्षमता वाटत नाही तेच लोक भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. आमच्याही संपर्कात भाजपचे काही पदाधिकारी आहेत. सर्व समविचारी पक्षांना बरोबर घ्यायची आमची भूमिका आहे असंही जयॆत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS