विधान परिषद जागावटपावरुन आघाडीत जोरदार रस्सीखेच, राष्ट्रवादीला हव्यात 4 जागा, काँग्रेस म्हणतेय 3-3 चा फॉर्म्युला !

विधान परिषद जागावटपावरुन आघाडीत जोरदार रस्सीखेच, राष्ट्रवादीला हव्यात 4 जागा, काँग्रेस म्हणतेय 3-3 चा फॉर्म्युला !

मुंबई – विधान परिषदेच्या 6 जागांसाठी लागलेल्या निवडणुकीत जागावाटपावरून आघाडीमध्ये चांगलीच रस्सीखेच पहायला मिळतेय. यापूर्वीच्या फॉर्म्युल्यानुसार तीन काँग्रेस आणि 3 राष्ट्रवादी काँग्रेस जागा लढवेल असा काँग्रेसचा फॉर्म्युला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा हव्या आहेत. यापूर्वी नाशिक, कोकण आणि हिंगोली परभणीची जागा राष्ट्रवादी काग्रेसकडे होत्या. तर लातूर-उस्माबाद-बीड, अमरावती आणि वर्धा या तीन जागा काँग्रेसकडे आहेत. मात्र लातूर बीड उस्मानाबादच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केला आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडे काँग्रेस पेक्षा जास्त मतदान आहे. त्यामुळे ती जागा आम्हाला हवी आहे असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

यापूर्वीही या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद जास्त होती. मात्र माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यामुळे ही जागा त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख यांच्याकडे गेली होती. ते या मतदारसंघातून सहज विजयी व्हायचे. आता दिलीपराव देशमुख हे निवडणूक लढवणार नसल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं या जागेवर दावा सांगितला आहे. राज्यातले दोन्ही पक्षाचे नेते आपआपल्या दाव्यावर ठाम आहेत. त्यामुळे यातून ते कसा तोडगा काढतात की केंद्रातल्या नेत्यांना यामध्ये हस्तक्षेप करावा लागतो ते पहावं लागेल.

COMMENTS