कोकणात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी

कोकणात भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये आघाडी

रत्नागिरी : भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार आहे. या तिन्ही पक्षांनी आगामी सर्व निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढण्याची वलग्ना केली जात आहे. मात्र, कोकणातील रत्नागिरीच्या राजापूर नगरपरिषदेत या महाविकास आघाडीची मात्र बिघाडी झाली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने इथं चक्क भाजपच्या साथीनं शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे.
राजापूर नगरपरिषदेत आघाडीत बिघाडी झाली आहे. समिती सभापती निवडीत शिवसेना बॅकफूटवर गेली.

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असलं तरी स्थानिक पातळीवर भलतीच राजकीय समीकरणं आकाराला येतात. मागील अनेक वेळा आपण पाहिले असले काँग्रेस आणि भाजप एकमेकांचे कट्टर वैरी असताना स्थानिक पातळीवर या दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी आघाडी करून सत्ता मिळवली. राजापूर नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती निवडणुकीत तेच पाहायला मिळालं. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनं भाजप नगरसेवकाला हाताशी धरून शिवसेनेला धोबीपछाड केलं. या निवडणुकीत परवीन बारगीर आणि स्नेहा कुवेस्कर या आघाडीच्या उमेदवारांनी बाजी मारली.

काँग्रेस-राष्ट्रवादी पाठिंब्याने राज्यात शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत. स्थानिक पातळीवरील निवडणुकीत शिवसेनेला सोबत घ्या, असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीला दिले होते. मग स्थानिक पातळीवर वेगळाच खेळ कसा रंगतो, असा प्रश्न राजापूरमधील शिवसेना नेत्यांना पडला आहे. राज्यातली समीकरणं वेगळी आणि स्थानिक पातळीवरचं राजकारण वेगळं… हेच चित्र राजापूरमध्ये दिसलं. नजीकच्या भविष्यात हा राजापूर पॅटर्न आणखी काय वळण घेतो, याकडं आता लक्ष लागलं आहे.

COMMENTS