काँग्रेसला धक्का, आणखी एका नेत्याचा राजीनामा!

काँग्रेसला धक्का, आणखी एका नेत्याचा राजीनामा!

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला धक्क्यावर धक्के बसत आहेत. पक्षतील अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. अजूनही पक्षातील काही नेते राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा असतानाच पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी झालेल्या मतभेदानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. सिद्धू यांनी जून महिन्याच्या 10 तारखेलाच राजीनामा दिला आहे. मात्र आज त्यांनी ट्वीट करत आपण राजीनामा दिल्याचं जाहीर केलं आहे.

दरम्यान पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात टोकाचे मतभेद निर्माण झाले होते. दोन्ही नेते एकमेकांविरोधात जाहीरपणे बोलत होते. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अमरिंदर सिंग यांनी सिद्धू यांच्यासह अनेक मंत्र्यांचे खाते बदलले होते. सिद्धूकडे नागरी प्रशासन विभागाची जबाबदारी होती. ती काढून त्यांच्याकडे ऊर्जा खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र खातेबदल झाल्याने सिद्धू नाराज होते.

दोघांमधील वाद राहुल गांधी यांच्यापर्यंतही पोहोचला होता. मात्र याची हायकमांडने गंभीर दखल घेतली नसल्यान् सिद्धू यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचं बेललं जात आहे. तसेच मंत्रीपदाचा राजीनामा सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांना न पाठवता काँग्रेस नेते राहुल गांधी यांना पाठवला आहे. त्यामुळे सिद्धू यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का हे पाहण गरजेचं आहे.

COMMENTS