…तो संघर्ष करून धनंजय मुंडेंनी लोकप्रियता मिळवली – प्रा. दत्ता भगत

…तो संघर्ष करून धनंजय मुंडेंनी लोकप्रियता मिळवली – प्रा. दत्ता भगत

पळसप जि. उस्मानाबाद – ग्रामीण भागात असलेल्या समस्यांना साहित्यातून वाचा फोडून त्या समाजासमोर व राजसत्तेसमोर मांडाव्यात, साहित्य व भाषेची सेवा करण्यासोबतच समाज सेवेचेही आव्हान मराठवाड्यातील साहित्यिकांनी स्वीकारावे असे आवाहन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. ते पळसप येथील ८व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उदघाटन समारंभात बोलत होते.

ग्रामीण भागातील आपली संस्कृती, आपले आचार विचार यासह आपल्या समस्यांचेही प्रतिबिंब ग्रामीण साहित्याच्या माध्यमातून उमटले पाहिजे. सत्तेत असताना राज्याचा मंत्री म्हणून लोकांच्या समस्या सोडविताना या ग्रामीण समस्यांशी अंतर्मुख होण्यासाठी हे साहित्य नक्कीच फायदेशीर ठरेल असे मत मुंडे यांनी व्यक्त केले.

वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप, व महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कै. वसंतराव काळे यांच्या १४व्या पुण्यतिथीनिमित्त ८ व्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचे धनंजय मुंडे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न झाले.

पुढे बोलताना कै. वसंतराव काळे यांनी ग्रामपंचायत पासून ते विधानपरिषदेचे आमदार असा प्रवास करताना शेती, शिक्षण व ग्रामीण विकास या क्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा विसर पडू नये म्हणून त्यांच्या पुण्यस्मरण निमित्त ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे मराठवाडा साहित्य संमेलन आ. विक्रम काळे दरवर्षी आयोजित करतात, हे अत्यंत अभिनव आहे. वसंतराव काळे यांचा समाजसेवेचा वारसा विक्रम काळे समर्थपणे पुढे चालवतील असेही ना. मुंडे म्हणाले.

यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. दत्ता भगत, उस्मानाबादचे खा. ओमराजे निंबाळकर, आ. सतिष चव्हाण, माजी आ. वैजनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश बिराजदार, ज्येष्ठ साहित्यिक भास्कर चंदनशिव, नरेंद्र काळे, सौ. शुभांगीताई काळे, सौ. अनुराधा ताई काळे, सम्मेलनाचे स्वागताध्यक्ष आ. विक्रम काळे, प्रा. मधुकर गायकवाड, बालाजी तांबे, डॉ. हरिदास फेरे, प्रा. अंकुश नाडे, मंगेश निपाणीकर, उद्धव मस्के, अनिल सूर्यवंशी, रहेमान काझी आदी मान्यवरांसह साहित्यिक, साहित्यप्रेमी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी मुंडेंनी आपल्या विद्यार्थी संघटनेतील कामाची आठवण काढत कै. वसंतराव काळे यांच्या भेटीतील आठवणींना उजाळा दिला.

धनंजय मुंडे पुढे बोलताना म्हणाले की ग्रामीण भागातील नवोदित साहीत्यिकांना विक्रम काळेंच्या या अभिनव प्रयोगाने हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे. तीन वेळा आमदार होण्याचा विक्रम करणारे विक्रम काळे वडीलांप्रमाणे कर्तृत्ववान होऊन नावलौकिक करण्याचाही विक्रम करतील!

दरम्यान आपल्या भाषणातून खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेले महाविकास आघाडीचे सरकार हे दीर्घकाळ टिकणारे, आश्वासक व लोकाभिमुख निर्णय घेणारे सिद्ध होईल असा विश्वास मुंडेंनी व्यक्त केला.

धनंजय मुंडे म्हणजे लोकप्रियता मिळवलेला विचारवंत – प्रा. दत्ता भगत

अनेकांना सिनेमातील नटा प्रमाणे लोकप्रियता मिळते, लोक गर्दी करतात म्हणून ते हुरळून जातात परंतु माणुसकी टिकावी, जनतेला न्याय मिळावा यासाठी संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष करून धनंजय मुंडेनी लोकप्रियता मिळवली आहे तसेच ही लोकप्रियता कायम टिकवून ठेवू शकेल असा जनतेची कामे करणारा विचारवंत देखील त्यांच्यात आहे असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक प्रा. दत्ता भगत यांनी केले.

पुढे बोलताना प्रा. भगत यांनी सामाजिक न्याय या शब्दाचा सखोल अर्थ इतिहासातील विविध उदाहरणे देऊन सांगितला; तसेच महापुरुषांचे चरित्र लेखन कसे केले जाते व त्यातून घडलेल्या ऐतिहासिक गांधी – आंबेडकर यांच्यातील संबंधाचा एक किस्साही सांगितला.

यावेळी प्रा. अर्जुन जाधव लिखित राजमाता जिजाऊ, अमर्त्य सेन ही दोन पुस्तके व चंद्रदीप नांगरगे यांच्या पानाफुलांच्या दुनियेत या काव्यसंग्रहाचे प्रकाशनही सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

COMMENTS