बार्शी – करपलेल्या पिकांचे पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करा, आमदार दिलीप सोपल यांची मागणी !

बार्शी – करपलेल्या पिकांचे पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करा, आमदार दिलीप सोपल यांची मागणी !

सोलापूर – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम 2018 मधील पावसा अभावी पिके करपून गेल्याने पिकांचे त्वरीत पंचनामे करुन दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी केली आहे.  बार्शी तालुक्यात खरीप हंगाम 2018 मध्ये 39 हजार 758 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. बार्शी तालुका रब्बीचा तालुका असला तरी सध्या खरीपाचे क्षेत्र मोठयाप्रमाणात वाढले आहे. मे महिन्यामध्ये विविध प्रसार माध्यमांनी हवामान खात्याच्या वतीने 2018 मध्ये सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज वर्तवीला होता. जून महिन्यात पडलेल्या रिमझिम पावसावर शेतकर्‍यांनी मोठया अपेक्षेचे ओझे डोक्यावर ठेऊन उसने पासने पैसे घेऊन, सावकार, बँकेकडून कर्ज काढून शेतीची मशागत करुन बी-बीयाणे, खते, औषधे उपलब्ध करुन खरीपातील सोयाबीन मूग, उडीद, तुर व अन्य पिकांची पेरणी मोठया प्रमाणात केली. परंतु गेली महिनाभर कसलाही पाऊस न झाल्याने पाण्याअभावी मुग,उडीद, सोयाबीन इ. पिके वाळून चालली असल्याचं दिलीप सोपल यांनी म्हटलं आहे.

तसेच कांदा पिकाचेही उत्पादन बार्शी तालुक्यामध्ये मोठयाप्रमाणात घेतले जाते. शेतकर्‍यांनी महागा मोलाचे बी आणुन कांद्याची रोपे टाकलेली आहेत. आज रोप लागणीला आलेले असून पाण्या अभावी कांदा लागवड धोक्यात आलेली आहे. पिकांना पाणी देण्यासाठी सध्या विहीरीला पाणी राहिलेले नाही. बर्‍याच ठिकाणी विहीरी कोरडया पडल्या आहेत. जनावरांच्या चार्‍याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थीती निर्माण झाली आहे. पाऊस हा पूर्ण भागामध्ये सरसकट होत नाही. बार्शी तालुक्यात प्रत्येक मंडल नुसार परजन्य मापक बसवावेत व ते अद्ययावत असावेत. बार्शी शहरातील असलेल्या परजन्य मापकावरुन पावसाची आकडेवारी घेतली जाते ते अन्यायकारक आहे. कारण पाऊस हा ग्रामीण भागापेक्षा बार्शी शहरामध्येच असतो. या अशा सर्व कारणामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. पावसाने दडी मारली, शासनाची कोणतीही मदत मिळत नाही या सर्व संकटामुळे जगायचे कसे हा मोठा प्रश्न शेतकर्‍यासमोर उभा असल्याचंही सोपल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट व अन्य कारणामुळे पिकाचे नुकसान होते. अशा वेळेस काही अंशी शेतकर्‍यांना पिक विम्याचा आधार मिळतो. यामुळे मोठया अपेक्षेने शेतकरी पिकांचा विमा उतरवतात. परंतु विमा कंपनीकडूनही व्यापारी दृष्टीकोन ठेवला जातो. ही दुर्दैवाची बाब आहे. सन 2017 मध्ये मुग आणि उडीदाला अत्यल्प प्रमाणात पिक विमा मंजुर केला. परंतु मोठया प्रमाणात सोयाबीन पिकाचा विमा उतरवला होता. परंतु या पिकास विमा मंजुर केला नाही. त्यामुळे शेतकर्‍यांची फसवणुक झाली. शेतकर्‍यांची अवस्था ही आई भाकरी देईना व बाप भिक मागू देईना अशी झाली आहे. शासनाच्या उदासिन धोरणामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. यामुळे शेतकर्‍यांचे आत्महत्तेचे प्रमाण वाढत असल्याचंही सोपल यांनी येळी म्हटलं आहे.

त्यामुळे शासनाने संपूर्ण बार्शी तालुक्यातील खरीप पिकांचे सरसकट पंचनामे करुन त्वरीत शेतकर्‍यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी व बार्शी तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा अन्यथा बार्शी तहसिल समोर शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आमरण उपोषण करुन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांनी दिला आहे.

COMMENTS