दिल्लीच्या तख्तावर शिवबा पुन्हा होणार छत्रपती !

दिल्लीच्या तख्तावर शिवबा पुन्हा होणार छत्रपती !

दिल्ली – दरवर्षी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा पार पडत असतो. परंतु यावर्षीचा हा सोहळा आगळावेगळा असणार असून संपूर्ण देश हा सोहळा पाहणार आहे. कारण राजधानी दिल्लीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या सहा जुनला मोठ्या थाटामाटात शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. शिवरायांचे वंशज असणारे छत्रपती संभाजीराजे यांच्या पुढाकारामुळे संपूर्ण देशाला शिवरायांना अभिवादन करता येणार आहे. दिल्लीमध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पार पाडण्यासाठी संभाजीराजेंचे अनेक वर्षांपासून प्रयत्न होते. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आलं असून राजपथावर होणाऱ्या विविध राज्यांच्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या दिमाखदार चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा संपूर्ण देशालाच नव्हे तर जगाला पहायला मिळणार आहे.

दरवर्षी किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो या सोहळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतच असून लाखो शिवभक्त गडावर शिवरायांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असतात. परंतु देशाची राजधानी असणाऱ्या दिल्लीमध्येही शिवरायांचा तेजस्वी इतिहास सांगणारा एखादा कार्यक्रम घेण्याचे संभाजीराजेंचे प्रयोजन होते. या दृष्टीने संभाजीराजे यांनी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राच्या दिमाखदार चित्ररथावर शिवराज्याभिषेक सोहळा घेण्याचं ठरवलं आहे. भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान व देश आणि विदेशातील मान्यवरांसमोर चित्ररथाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक सोहळा साऱ्या जगासमोर मांडण्यात येणार आहे.गेल्या काही महिन्यांपासून संभाजीराजे यासाठी पाठपुरावा करीत होते. एक महिन्यापूर्वीच संभाजीराजेंच्या दिल्ली येथील निवासस्थानी या चित्ररथासाठी तयार करण्यात आलेल्या प्रतिकृतीची पाहणी करण्यात आली होती. त्यावेळी राजेंनी त्यामध्ये काही आवश्यक बदलही सुचविले होते.

६ जून १६७४ रोजी किल्ले रायगडावर शिवछत्रपती महाराजांचा राज्याभिषेक संपन्न झाला आणि मराठ्यांच्या स्वतंत्र व सार्वभौम राज्याची स्थापना झाली. ही गोष्ट असामान्य अशीच आहे. मुघल सत्तेला मूळातून हादरा देणारी ही घटना अखंड भारतवर्षाचा भाग्योदय करणारी आहे. त्यामुळे या शिवराज्याभिषेकाचे महत्त्व संपूर्ण देशाला समजावे, यातून येणाऱ्या तरुण पिढीला स्फूर्ती मिळावी, राष्ट्रप्रेमाची भावना जागृत व्हावी या उद्देशाने शिवरायांचे वंशज युवराज संभाजीराजे छत्रपती प्रयत्न करत आहेत. त्यांच्याच या प्रयत्नातून दिल्लीच्या तख्तावर शिवबा पुन्हा छत्रपती होणार आहेत.

 

 

COMMENTS