परळीतील आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न धनंजय मुंडेंनी सोडवला !

परळीतील आय.टी.आय. च्या विद्यार्थ्यांचा पाणीप्रश्न धनंजय मुंडेंनी सोडवला !

परळी – परळीच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणार्‍या 365 विद्यार्थ्यांचा पाणी प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज स्वतः आय.टी.आय. कॉलेजला भेट देवुन सोडवला. विद्यार्थ्यांच्या आणि कॉलेजच्या समस्या ऐकुण घेत त्या सोडवण्यासाठी मुंबईत कौशल्य विकास मंत्र्यांसोबत ते बैठकही घेणार असून, हे आय.टी.आय. कॉलेज आपण दत्तक घेवुन त्यांच्या समस्या सोडवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

1977 साली परळीत स्थापन झालेल्या आय.टी.आय. कॉलेजला सद्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत असून, त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनी काल धनंजय मुंडे यांची भेट घेतल्यानंतर स्वतः मुंडे यांनी आज आय.टी.आय. कॉलेजला भेट दिली. तेथील विद्यार्थ्यांचा पिण्याचा पाण्याचा मुख्य प्रश्न सोडविण्यासाठी नगर पालिकेकडून नियमित टँकर पुरविण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच उपलब्ध असलेल्या बोअरवरून पाईप लाईन करून पाणी देण्याचेही निर्देश त्यांनी मुख्याधिकारी, नगर परिषद यांना दिले.

या कॉलेजमधील रिक्त असलेल्या जागा, एक वर्षापासून विद्यार्थ्यांना न मिळालेले विद्यावेतन, तुटपुंज्या विद्या वेतनात वाढ करणे, कालबाह्य झालेल्या मशिनरी तातडीने बदलून नविन मशिनरी उपलब्ध करून देणे, तासिका तत्वावरील रिक्त पदे कायमस्वरूपी भरणे, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्लास टु मधून क्लास वन मध्ये अपग्रेडेशन करणे, तीन वर्षांपासून बंद असलेले वसतिगृह पुन्हा सुरू करणे, वर्ग 4 ची पदे भरणे, कॉलेजकडे जाणारा रस्ता व अंतर्गत रस्ते यांची दुरूस्ती करणे, मुलींचे शौच्छालय व इतर व्यक्तिगत अडचणी जाणुन घेत त्यांनी तातडीने मंत्री संभाजी पाटील निलंगेकर व वरिष्ठ अधिकार्‍यांना दुरध्वनीद्वारे संपर्क साधुन हे प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली तसेच या संदर्भात मंगळवारी मंत्रालयात ते मंत्री महोदयांसमवेत या विषयासंदर्भात बैठकही घेणार आहेत. हे कॉलेज आपल्या घराजवळ असल्याने त्याचे पालकत्व आपण स्वतः स्वीकारत असून, विद्यार्थ्यांच्या सर्व अडी-अडचणी सोडवण्यासाठी कटीबध्द असल्याची ग्वाही श्री.मुंडे यांनी दिली.

COMMENTS