अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये दोन दिवसात होणार कोविड – १९ चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार उद्घाटन !

अंबाजोगाईच्या स्वारातीमध्ये दोन दिवसात होणार कोविड – १९ चाचणीला प्रत्यक्ष सुरुवात, पालकमंत्री धनंजय मुंडेंच्या हस्ते होणार उद्घाटन !

अंबाजोगाई – पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे मंजुरी मिळालेल्या अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड – १९ विषाणू चाचणी प्रयोगशाळेस आवश्यक सामग्री तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची मान्यता मिळाली असून येत्या दोन दिवसात येथे प्रत्यक्ष कोरोना चाचणीला सुरुवात होणार आहे.

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या संचालिका तथा मुख्याधिकारी मेजर जनरल डॉ. विभा दत्ता यांनी स्वाराती येथील या प्रयोगशाळेस मान्यता दिली असून कोविड – १९ चाचणी सुरू करण्यास अनुमती दिली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते येत्या दोन दिवसात या प्रयोगशाळेचे उदघाटन होऊन प्रत्यक्ष चाचणीस सुरुवात होईल अशी माहिती स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी दिली.

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन बीड जिल्ह्यातच कोरोना स्वॅब ची तपासणी केली जावी, या अनुषंगाने मुंडे यांनी आरोग्य विभागाकडे येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना विषाणू चाचणी प्रयोगशाळेस मंजुरी देण्याबाबत मागणी करून यशस्वी पाठपुरावा केला होता; यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख, डॉ. निळेकर, डॉ. अमित लोमटे यांनी विशेष प्रयत्न केले.

या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्या मान्यतेसह स्वाराती रुग्णालयात कोरोना चाचणी प्रयोगशाळेचा प्रस्ताव भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (AIIMS) नागपूर यांचेकडे चाचणी सुरू करण्यासाठी परवानगी मिळण्यासाठी पाठविण्यात आला होता. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूरच्या वतीने या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे.

सुरुवातीला दर दिवसाला येथे कोरोना विषाणू संबंधीच्या स्वॅबच्या १०० नमुन्यांची तपासणी करणे शक्य होणार असून हळूहळू ही संख्या वाढवली जाईल, ही बीड जिल्ह्यातील पहिली प्रयोगशाळा ठरणार आहे. यासाठी लागणारे सर्व वैद्यकीय साहित्य रुग्णलयास उपलब्ध करून देण्यात आले असून अधिष्ठाता डॉ. देशमुख यांनी स्वाराती वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री ना. धनंजय मुंडे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार तसेच आरोग्य विभागाचे आभार मानले आहेत.

धनंजय मुंडेंमुळे स्वारातीला नवसंजीवनी!

दरम्यान धनंजय मुंडे यांच्या मुळे स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास नवसंजीवनी प्राप्त झाली आहे. मागील महिन्यात मुंडे यांनी स्वारातीमध्ये भेट देऊन आढावा घेतल्यानंतर दोनच दिवसात तेथे अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या एमआरआय मशीनचा प्रश्न मार्गी लावला होता. त्यानंतर काही दिवसातच स्वाराती मध्ये हाफकीन महामंडळाच्या माध्यमातून ७ व्हेंटिलेटर्स मिळवून दिले होते.

मुंडे यांच्या प्रयत्नातून अत्यंत महत्वाच्या व खर्चिक सुविधा मोफत उपलब्ध झाल्याने नवसंजीवनी प्राप्त झालेल्या जिल्ह्यातील एकमेव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जिल्ह्यातील पहिली कोरोना चाचणी प्रयोगशाळा सुरू करण्यात येत असल्याने मुंडे यांचे आभार व्यक्त केले जात आहेत.

COMMENTS