अरे लाज वाटत नाही का ? फोटो काय काढता ?, धनंजय मुंडेंनी तरुणांना झापलं !

अरे लाज वाटत नाही का ? फोटो काय काढता ?, धनंजय मुंडेंनी तरुणांना झापलं !

बीड – विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यामुळे दोन अपघातग्रस्तांना वेळीच वैद्यकीय मदत मिळाल्याने त्यांचे प्राण बचावले आहेत. बीड-परळी रस्त्यावर काल अपघात झाला होता. त्या अपघातात दोन तरुण रस्त्यावर जखमी अवस्थेत पडले होते. याचवेळी मुंडे यांचा ताफा त्याठिकाणाहून जात होता. त्यावेळी मुंडेंनी तात्काळ गाडी थांबवून या जखमींना आपल्या ताफ्यातील गाडीत नेवून वेळीच वैदकीय उपचार मिळवून दिले आहते. परंतु याच वेळी मुंडे यांनी फोटो आणि व्हिडीओ शुटींग करणा-या तरुणांना झापलं आहे.

झालं असं की, धनंजय मुंडे हे काल बीड येथील धनगर समाज आयोजित गुणवंत सत्कार सोहळा आटोपून परळी कडे येत असताना सायंकाळी 5.30 च्या सुमारास बीड- परळी रस्त्यावर घाटसावळी जवळ असलेल्या बकुरवाडी जवळ एका मोटार सायकल स्वाराचा गंभीर अपघात झाल्याचे त्यांना दिसले. अज्ञात फॉर्च्युनर वाहनाने त्यांना जोराची धडक देऊन पळ काढला होता. यातील एकाच्या डोक्याला मोठा मार लागल्याने रस्त्यात रक्तच रक्त पडले होते तर दुसरा मोटारसायकल स्वार रस्त्याच्या कडेला दूर फेकला गेला होता त्यास पायाला जबर मुका मार लागल्याने त्यास उठता ही येणे शक्य नव्हते.

अपघाताचे दृश्य दिसताच मुंडे यांनी आपली गाडी थांबवून त्या दोन्ही जखमींना स्वतः व सोबतचे सहकारी व इतरांच्या मदतीने उचलून आपल्या ताफ्यातील पोलीस बंदोबस्ताच्या गाडीतून तातडीने बीडकडे रवाना केले.बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात यांना फोनवर सूचना देऊन तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच पोलीस नियंत्रण कक्ष, पिंपळनेर पोलीस स्टेशन व शिवाजीनगर पोलीसांना स्वतः फोन करून तातडीने नाकाबंदी करून त्या वाहनाला पकडण्याच्या सूचना दिल्या.

विक्रम लिंबाजी कांबीलकर वय 35 वर्ष व शंकर नारायण जाधव वय 45 वर्षें माणकुर ता जि बीड अशी या जखमींची नावे असून त्यांना विशेष सुरक्षा पथकाचे पदमसिंह काळूसिंग सिंगल, समाधान लक्ष्मण लोखंडे, चालक संतोष हारके, पोलीस कॉन्स्टेबल एस एल कोरडे, यू.ए. बुंदीले यांनी त्यांना रूग्णालयात दाखल केले.

धनंजय मुंडे यांचे सोबत असलेले स्वीय सहाययक प्रशांत जोशी, सुरक्षा रक्षक सोपान चाटे, चालक संतोष जाधव यांनीही घटनास्थळी मदत कार्यात भाग घेतला.या दोघांवरही बीडच्या रुग्णालयात उपचार सुरू असून ते धोक्याच्या बाहेर असल्याचे डॉ थोरात यांनी सांगितले.

फोटो काढणा-यांना धनंजय मुंडेंनी झापले

घटनास्थळी या जखमींना मदत करण्याची एककिडे गडबड सुरू असतांना काही उत्साही तरुण मोबाइल वर त्याचे शूटिंग व फोटो घेत होते, हे दिसताच मुंडे यांनी त्यांना अरे लाज वाटत नाही का ? फोटो काय काढता ? जखमीना उचलू लागा, ती अपघातग्रस्त गाडी आधी रस्त्यातून बाहेर काढा असे सुनावले.

COMMENTS