पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंचा आणखी एक मोठा आरोप!

पंकजा मुंडेंवर धनंजय मुंडेंचा आणखी एक मोठा आरोप!

बीड – भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी आणखी एक मोठा आरोप केला आहे. पंकजा मुंडे यांनी चार वर्षांच्या टीएचआरच्या टेंडर पोषण आहारमध्ये हजार पंधराशे कोटी कमावले असल्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये ऊस घातलेल्या शेतकऱ्यांचे थकीत बिलाचे पैशे एफआरपीसह तत्काळ द्या, अन्यथा शासनाने संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी यावेळी धनंजय मुंडें यांनी केली. परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात धनंजय मुंडे बोलत होते.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने परळी उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये परळी तालुक्यातील बहुतांश शेतकरी सहभागी झाले आहेत. सोयाबीनसह सर्व पिकांचा पीक विमा मिळावा, वैद्यनाथ कारखान्याला दिलेल्या ऊसाची बिले मिळावीत, दुष्काळामुळे दुबार पेरणीसाठी मदत करावी, मागील काळातील थकीत अनुदाने द्यावेत, सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांच्या या प्रमुख मागण्यासाठी धनंजय मुंडे रस्त्यावर उतरले होते. त्याबरोबर परळी-अंबाजोगाई रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे, परळी तालुक्यातील प्रकल्पांचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करावा, परळी औष्णिक विद्युत केंद्र पुन्हा सुरू करावे, यासह शेतकरी, शेतमजूर आणि परळी शहरातील नागरीकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने धनंजय मुंडेंनी आंदोलन केले. राष्ट्रवादीच्या या आंदोलनाला अखेर यश आलं असून परळी व अंबाजोगाई तालुक्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या सोयाबीनच्या पीक विम्याचे पैसे 3 दिवसात देण्याचे तसेच वैद्यनाथ कारखान्याकडील ऊस गाळपाची बिले 25 ऑगस्ट पर्यंत देण्याचे प्रशासनाने लेखी आश्वासन दिले आहे.

COMMENTS