सरकारनं शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल !

सरकारनं शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, धनंजय मुंडेंचा हल्लाबोल !

महाड, रायगड – 400 वर्षांपूर्वी भारतात दिल्लीमध्ये एकच बादशाह होता. पण, रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करून देशात पहिले परिवर्तन केले. त्याकाळी शिवरायांनी रायगडावरून पहिली परिवर्तनाची सुरुवात केली. आज दिल्लीत नरेंद्र मोदी नामक तुघलकी निर्णय घेणारे बादशाह लोकशाहीत हुकूमशाही पद्धतीने भारतावर राज्य करत आहे, तसेच मुंबईचे सरकारही हुकूमशाहीचे आहे,  त्यामुळे आज रायगडपासून या हुकूमशाही सरकार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तनाची लढाई असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केले.राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन संपर्क यात्रेचा आज महाड येथून शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते.

सरकारने साडे चार वर्षात पदोपदी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. शिवस्मारकाची अजून एकही वीट ठेवली गेली नाही. शिवाजी महाराज यांच्या नावे कर्जमाफी जाहीर केली मात्र शेतकऱ्यांना मदत काही मिळाली नाही हा शिवाजी महाराज यांचा अपमान असल्याचे मुंडे म्हणाले.

आज चवदार तळ्याला जाऊन अभिवादन केले तिथे एक ओळ लिहिली आहे. हा संगर मानवमुक्ती साठी आहे. आज आंबेडकर यांचा ही अपमान होत आहे. घटना जाळायची कोणाची हिम्मत झाली नव्हती पण मोदींच्या काळात घटना जाळल्या गेली. काही कारवाई करण्यात आली नाही.

देशाचा विकास करण्याची भाषा यांनी केली होती कोकणचा विकास झाला आहे का ?  यावर्षी जर निवडणूक नसत्या तर पेट्रोलने शंभरी पार केली असती. चारशे रुपयांचा सिलेंडर आज हजारला विकला जात आहे. ही लूट आहे, ही लुट छोटी नाही यांनी देशाला राज्याला बरबटून खाल्लं असा हल्ला मुंडे यांनी केला. शिवसेना एकीकडे विरोध करते पण आजही शिवसेना सत्तेत आहे. भाजपने शिवसेनेची धार घालवली हे सांगताना त्यांनी वाघ आणि तिच्यावर प्रेम असणा-या मुलीची गोष्ट सांगितली.

उद्धव ठाकरे काल युती गेली खड्ड्यात म्हणाले, त्यांना लवकर कळलं की जनता या युतीला खड्ड्यात घालेल असा टोला मुंडे यांनी लगावला.मोदी काल सोलापुरात होते ते म्हणाले की चौकीदार देशाचे संरक्षण करेल. मोदी यांच्या मागेच दोन मंत्री बसले होते ज्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे पैसे खाल्ले याकडे लक्ष वेधले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल मंत्री असताना भेल सारखा प्रोजेक्ट इथे आणला. आज कोकणात का एकही प्रकल्प येत नाही असा सवाल मुंडे यांनी केला.हे सरकार सर्वमान्य नाही त्यांना उखडून टाका म्हणून हे परिवर्तन करायचे आहे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधी मंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, ज्येष्ठ नेते आमदार छगन भुजबळ, राष्ट्रीय सरचिटणीस सुनिल तटकरे, माजी मंत्री गणेश नाईक, अनिल देशमुख, आमदार अनिकेत तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, आमदार विदया चव्हाण, आमदार जितेंद्र आवाड , पांडुरंग बरोरा, राष्ट्रीय महिला अध्यक्षा फौजिया खान, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी आमदार जयदेव गायकवाड, प्रकाश गजभिये, आदींसह पक्षाचे इतर सर्व नेते उपस्थित होते.

COMMENTS