बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे  जिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन !

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांचे जिल्हावासीयांना कळकळीचे आवाहन !

परळी – विविध व्यवसायातील व्यापाऱ्यांच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या अँटिजेन टेस्टमुळे कोरोना विषाणूची बाधा झालेले नवे आकडे समोर येत असताना, कोरोनाचा फैलाव रोखण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काही प्रमुख शहरांमध्ये दहा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्हा वासीयांनी विशेष काळजी घेण्याची गरज असल्याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बीड शहरात सुरू असलेल्या अँटिजेन टेस्टच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील अनेक व्यापारी बांधवांची चाचणी करण्यात आली असून, त्यातूनही कोरोना पॉझिटिव्ह आकडेवारी समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोरोनाच्या फैलावाला ब्रेक लावण्यासाठी बीड, परळी, अंबेजोगाई, आष्टी, माजलगाव आणि केज ही शहरे दि. १२ ऑगस्ट पासून दहा दिवसांसाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

कोरोनाची साखळी तोडून फैलावाला आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, सोशल डिस्टनसिंगचे प्रत्येक ठिकाणी काटेकोरपणे पालन केले जावे, तसेच संबंधित ६ शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनच्या नियमांचे कटाक्षाने पालन करावे असे कळकळीचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे.

बीड जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढत असली तरी लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असलेले रुग्ण अधिक आहेत, त्यामुळे योग्य काळजी व उपचाराने त्यांचे बरे होण्याचे प्रमाणही अधिक आहे. म्हणूनच नागरिकांनी घाबरून न जाता अधिकाधिक काळजी घेऊन कोरोनाची ही साखळी तोडता येणे शक्य असल्याचेही मुंडे यांनी म्हटले आहे.

दरम्यान नव्याने आढळलेल्या कोरोना बाधित रुग्णांना कोरोनाविषयक कोणतेही लक्षणे नसल्यास व त्यांची प्रकृती स्थिर असल्यास पल्स ऑक्सिमीटरची योग्य सोय करून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरीच योग्य सुविधांसह अलगिकरणात ठेवता येईल, अशी सूचनाही मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला केली होती; त्यानुसार आता कोणतेही लक्षणे नसलेल्या नवीन कोरोना बाधित रुग्णांना आवश्यक तपासण्या करून घरीच अलगीकरण करून ठेवण्यात येणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या फैलावाला रोखण्यासाठी नागरिकांनी अधिकाधिक सतर्क राहून एकमेकांशी संपर्क टाळावा, अनावश्यक घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा वासीयांना केले आहे.

COMMENTS