भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा – धनंजय मुंडे

भाजपाची महाजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा – धनंजय मुंडे

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिवस्वराज्य यात्रेला आजपासून जुन्नर येथून सुरुवात झाली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. भाजपाची महजनादेश यात्रा ही ‘चालू’ मुख्यमंत्र्यांची ‘चालू’ यात्रा आहे. मुळात ती महा’धना’देश यात्रा आहे. मीच मुख्यमंत्री राहणार हे मिरवण्यासाठीची यात्रा आहे. तर आदित्य ठाकरे यांची यात्रा मीच मुख्यमंत्री होणार हे सांगण्यासाठीची आहे. आपली शिवस्वराज्य_यात्रा मात्र जनतेच्या हितासाठी असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ल्याची पवित्र माती कपाळाला लावून आज आम्ही या शिवस्वराज्य यात्रेच्या प्रारंभी निश्चय केलाय की हे दळभद्री सरकार उलथून टाकून, रयतेचे राज्य आणायचे असल्याचं धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा या सरकारने वेळोवेळी अपमान केला आहे. छत्रपतींच्या स्मारकाची एक वीटही अद्याप रचलेली नाही. त्यांच्या नावाने जाहीर केलेली कर्जमाफीही फसवी निघाली. जुन्नरकर हा अपमान कधीच सहन करणार नाही.

बहात्तर हजार नोकऱ्यांसाठी मेगाभरती करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याचे काय झाले? अहो तुम्ही तर आपल्या पक्षातच मेगा भरती सुरू केली आहे. भाजपामुळे राजकारणात गुन्हेगारीकरण वाढत चालल्याची दुर्दैवी चित्र समोर येत असल्याचंही यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे.

खोटं बोला पण रेटून बोला हा मुख्यमंत्र्याचा उद्योग सुरू आहे. म्हणे ५० हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली आहे. मात्र आर्थिक अहवालात तर मुख्यमंत्र्यांचं हे ‘सत्य’ कुठेच नाही. मुख्यमंत्री साहेब, किती खोटं बोलवं याचे तरी भान राखा असा टोलाही यावेळी मुंडे यांनी लगावला आहे.

COMMENTS