मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी बैठका बिनकामाच्या, कुठे आहेत उपाययोजना? – धनंजय मुंडे

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळी बैठका बिनकामाच्या, कुठे आहेत उपाययोजना? – धनंजय मुंडे

कन्नड ( औरंगाबाद ) – राज्यात आणि मराठवाड्यात तीव्र दुष्काळ आहे. दुष्काळ जाहीर होऊन 3 महिने झाले, मुख्यमंत्र्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन दुष्काळी बैठका घेतल्या, त्याचे फलित काय ? कुठे आहेत उपाययोजना ? असे म्हणत विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारला धारेवर धरले. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवर्तन संकल्प यात्रा आज सहाव्या दिवशी मराठवाड्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील सभेत ते बोलत होते.

आज महाराष्ट्रात भीषण दुष्काळ आहे. दीड महिन्यांपूर्वी घेतलेल्या बैठकांचे फलित काय? कुठे आहेत चारा छावण्या ? कुठे आहेत रोजगाराची कामे ? कधी देणार शेतक-यांना मदत असे सवाल त्यांनी उपस्थित केले.शेतकऱ्यांसाठी आपल्या राज्याची तिजोरी रिकामी करण्याचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्यासमोर आहे. हे कृतीशुन्य सरकार फक्त शिवाजी महाराज यांचं नाव वापरतं असा आरोप मुंडे यांनी केला.

चंद्रकांत खैरे साहेब औरंगाबाद लोकसभा मतदार संघाच्या सातबाऱ्यावर तुमचे नाव कायम कोरले आहे असे समजू नका. येणाऱ्या लोकसभा निवडणुकांमध्ये या मतदारसंघात परिवर्तन होणारच हा माझा विश्वास आहे असे मुंडे म्हणाले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, विधिमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री फोजीया खान, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, कैलाश पाटील, किशोर पाटील आदी उपस्थित होते.

हे तर सरकारचे अपयश

शेतकऱ्यांना अर्धनग्न अवस्थेत मोर्चा काढावा लागत आहे हे सरकारचे अपयश आहे. सरकार जाणीवपूर्वक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्याची इतकी वाईच अवस्था कधीच नव्हती अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलतांना दिली.

त्यांची महाराजांवर खरोखरच निष्ठा आहे का ?

राष्ट्रमाता जिजाऊ यांचे नाव समृद्धी महामार्गाला देण्यात यावे ही प्रामाणिक मागणी सर्वात आधी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने केली. मॉं जिजाऊ यांचे नाव देण्याची आमची मागणी कोणाला खोडसाळपणा वाटत असेल तर त्यांची खरंच छत्रपती शिवाजी महाराजांवर निष्ठा आहे का? ही शंका उपस्थित होते असेही त्यांनी आणखी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

COMMENTS