कर्जासाठी आणखी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहे, धनंजय मुंडे यांची घणाघाती टीका !

कर्जासाठी आणखी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी, सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले आहे, धनंजय मुंडे यांची घणाघाती टीका !

यवतमाळ – कर्जासाठी आणखी एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळमध्ये ही घटना घडली असून दुग्ध व्यवसायाकरिता कर्जासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे  शरीरसुखाची मागणी केली आहे. दारव्हाच्या नायगाव येथील सोसायटीच्या सचिवानं ही मागणी केली असून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचा सचिव दादाराव इंगोले विरुद्ध दारव्हा पोलीस स्टेशनमध्ये भादवि कलम 354 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान या महिलेनं 4 एकर शेतीसोबत दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मागितले असल्याची माहिती आहे. याबाबत महिलेनं सर्व कागदपत्र देऊनही कर्ज मंजुरीस टाळाटाळ करून सचिवाने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सचिवांच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप पोलिसांकडे सादर करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास ते करत आहेत.

दरम्यान या घटनेनंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. हे सरकार धृतराष्ट्रासारखे आंधळे झाले असल्याची घणाघाती टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे. याबाबतचं ट्वीट मुंडे यांनी केलं असून पेरणीचा हंगाम सुरू झाला तरी शेतक-यांना पीककर्ज मिळत नाही, शेतक-यांना कर्जासाठी इतके हतबल व्हावे लागते की शरीरसुखाची मागणी करण्यापर्यंत अधिकारी, कर्मचा-यांची मजल गेली आहे. महाराष्ट्रासारख्या राज्याला ही लाजिरवाणी बाब आहे. सरकार मात्र ‘धृतराष्ट्र’ सारखे आंधळे होऊन बसले असल्याचं मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यापूर्वी बुलडाणा जिल्ह्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या मॅनेजरने शेतकऱ्याच्या पत्नीला पीक कर्ज मंजुरीसाठी शरीरसुखाची मागणी केली होती. त्यानंतही ही दुसरी घटना घडली असल्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे अशा अधिका-यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

COMMENTS