सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते – धनंजय मुंडे

सुधीर मुनगंटीवारांच्या वक्तव्याची कीव करावीशी वाटते – धनंजय मुंडे

मुंबई – राष्ट्रपती राजवटीबाबत मुनगंटीवार यांच्या विधानावर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर मला कीव करावीशी वाटते. महायुती म्हणून अनेक पक्षांनी एकत्र येऊन राज्यातील निवडणूक लढवली. महायुतीला स्पष्ट बहुमत असताना हे लोक सरकार स्थापन करू शकत नाहीत. यांना बहुमत दिलंय तरी ते राष्ट्रपती राजवटीची भाषा करतायत हा राज्यातील जनतेचा अपमान असल्याचं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान मुनगुंटीवार यांनी राज्यातील जनतेची आधी माफी मागावी आणि मग राष्ट्रपती राजवटीची भाषा करावी.आघाडीला विरोधी पक्षाचा कौल राज्यातील जनतेने दिला आहे.तो कौल लक्षात घेऊन आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करू. काँग्रेसचे नेते दिल्लीत गेलेत त्यांचे काय ठरेल तेव्हा बघू, आता जर तर बाबत मी बोलणार नाही असंही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.

तसेच महाराष्ट्र परतीच्या पावसाने शेतीचं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा शेतकरी उद्ध्वस्त झालाय. शेतकऱ्यांना नुकसानीची पूर्ण भरपाई सरकारने द्यावी अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे.

काय म्हणाले होते सुधीर मुनगंटीवार?

राज्यात ७ नोव्हेंबरपर्यंत सरकार स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती शासन लागू होऊ शकतं, असं वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र असं संबोधतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची स्थिती यापूर्वीही कधी उद्भवली नव्हती आणि यापुढेही उद्भवणार नाही, तसंच राज्यात महायुतीतच सरकार स्थापन होईल, असंही मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

COMMENTS