महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप – धनंजय मुंडे

महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप – धनंजय मुंडे

बीड, माजलगांव – सात मुलींच्या नंतर आठव्या बाळंतपणाच्या वेळी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे नवजात बालकासह माजलगाव येथील  मीरा रामेश्वर एखंडे या महिलेच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या डॉ. सूर्यकांत साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून दोषींना कडक शिक्षा द्यावी तसेच पीडित कुटुंबाला सरकारने पन्नास लाखांची मदत करावी अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

एखंडे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केल्यावर मुंडेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्य विभाग आणि महिला व बालकल्याण विभागाला चांगलेच धारेवर धरले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, अशोक डक, अरुण इंगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

२८ डिसेंबर २०१८ रोजी डॉ. सूर्यकांत साबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे प्रसृती दरम्यान मीरा रामेश्वर एखंडे आणि त्यांच्या नवजात अर्भकाचा मृत्यू झाला होता. एखंडे कुटुंबियांना डॉ. साबळेने अत्यंत वाईट पद्धतीने वागणूक दिली. आपला डॉक्टरकीचा धर्म विसरून सुमारे गेल्या आठ वर्षांपासून डॉ. साबळेने माजलगांव ग्रामीण रुग्णालयात निर्दयीपणाने स्वतःचे दुकान थाटले आहे. कधी पत्रकारांना धमकवणे, त्यांच्या विरोधात खोट्या केस करणे असले बेकायदेशीर कृत्य उघडपणे सुरू केले आहेत. डॉ. साबळेवर याआधी कलम ३०७, अट्रोसीटी आदी गंभीर गुन्हे दाखल आहेत.

तसेच हा डॉक्टर खाजगी प्रॅक्टिस राजरोसपणे करत आहे तरीही त्याचे बेकायदेशीर कृत्य दिवसेंदिवस वाढतच आहेत. या सर्व गंभीर बाबींवर ना. धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.लोकांचे जीव वाचवणाऱ्या डॉक्टरला दोन दोन पिस्तूल परवाने सरकार का देत असावे? डॉ. साबळेच्या पाठीशी जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडेंच्या राजकीय वरदहस्त आहे म्हणूनच ही सर्व अनागोंदी सुरू आहे.

“बेटी बचाव बेटी पढाव” चा नारा सरकार देते आणि ७ मुलींना जन्म देणा-या एखंडे कुटुंबाच्या पाठीशी सरकार का उभे राहत नाही? असा खडा सवाल धनंजय मुंडेंनी विचारला आहे.महिला व बालकल्याण मंत्र्यांच्या जिल्ह्यात अशी गंभीर घटना हे सरकारचे पाप आहे असेही मुंडे यावेळी म्हणाले. पीडित एखंडे कुटुंबीयांना सरकारने तत्काळ पन्नास लाखांची मदत करावी तसेच सर्व सात मुलींचे पालकत्व शासनाने स्वीकारावे,  सोबतच डॉ. सूर्यकांत साबळे, जिल्हा अधिष्ठाता डॉ. अशोक थोरात आणि संबंधित सर्वांची आरोग्य विभागाच्या सचिवांमार्फत चौकशी करावी अशी मागणी मुंडेंनी केली आहे.

COMMENTS