धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघाला मोठी भेट, परळी बायपाससह, परळी – गंगाखेड व परळी – धर्मापुरी रस्त्यांच्या कामाला मंजुरी!

धनंजय मुंडेंची परळी मतदारसंघाला मोठी भेट, परळी बायपाससह, परळी – गंगाखेड व परळी – धर्मापुरी रस्त्यांच्या कामाला मंजुरी!

परळी – परळीचे आमदार तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळी मतदारसंघातील जनतेला मोठी भेट दिली असून, त्यांच्या प्रयत्नातून परळी शहराचा बायपास, परळी ते गंगाखेड रस्ता व परळी ते धर्मापुरी रस्ता या तीनही कामांना मंजुरी मिळाली आहे.

परळी शहराच्या बायपासला मागील पालकमंत्र्यांच्या कार्यकाळात अनेकवेळा उदघाटने होऊनही मंजुरी किंवा निधी उपलब्ध होऊ शकला नव्हता. तसेच परळी ते गंगाखेड व परळी ते धर्मापुरी रस्ता अगदीच खराब झाल्याने त्यावरून जीव मुठीत धरून नागरिकांना प्रवास करावा लागत होता.

धनंजय मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान हे तीनही महत्त्वाचे रस्ते पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

निवडून आल्यापासून त्यांनी तातडीने या तीनही रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू केला, या रस्त्यांना त्यांनी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळवून दिला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

त्यामुळे परळी शहर बायपास राष्ट्रीय महामार्ग क्र. ५४८८ याचे ४ किमी लांबीचे चारपदरी बांधकाम करण्यासाठी ६०.२३ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असून त्याची निविदादेखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.

तर परळी ते गंगाखेड हा अत्यंत रहदारीचा व महत्वपूर्ण मानला जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ हा ३०.४० किमी लांबीचा रस्ता पेव्हर शोल्डर पद्धतीने दोन पदरी बांधकाम करण्यासाठी २२० कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.

तसेच परळी ते धर्मापुरी या राष्ट्रीय महामार्ग क्र. ३६१ एफ चा भाग असलेल्या २२.५० किमी लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण, सशक्तीकरण व सुशोभीकरण करण्यासाठी ५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व रस्ते विकास मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या २०२० – २१ च्या वार्षिक रस्ते विकास आराखड्यात या तीनही रस्त्याचा समावेश करण्यात आला असून, याबद्दलचे अधिकृत पत्र राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागास प्राप्त झाले आहे.

मतदारसंघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या या 3 रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिल्याबद्दल धनंजय मुंडे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे आभार व्यक्त केले आहेत.

COMMENTS