जिव्हाळ्याच्या परळी- अंबाजोगाई रस्त्याचे भूमीपूजन संपन्न, आता बोलून नाही रस्ता पूर्ण करून दाखवणार – धनंजय मुंडे

जिव्हाळ्याच्या परळी- अंबाजोगाई रस्त्याचे भूमीपूजन संपन्न, आता बोलून नाही रस्ता पूर्ण करून दाखवणार – धनंजय मुंडे

परळी वै. – अनेक वर्षांपासून रखडलेल्या, संपूर्ण राज्यात चर्चिलेल्या व परळीकरांच्या जिव्हाळ्याच्या परळी ते पिंपळा धायगुडा ता. अंबेजोगाई रस्त्याच्या कामाचे आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.यावेळी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वेळेची मर्यादा पाळत ना. मुंडेंनी भाषण टाळले मात्र आता बोलून नाही रस्ता पूर्ण करून दाखवीन असे ना. मुंडे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

भाजपच्या सरकारच्या काळात माजी पालकमंत्र्यांना गेल्या तीन वर्षात तीनवेळा उदघाटन करूनही हा १८.५० किमी रस्ता पूर्ण करता आला नाही. धनंजय मुंडे यांनी नव्याने अंदाजे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केल्याने येत्या १८ महिन्याच्या आत हा रस्ता पूर्ण करू असा विश्वासही यावेळी श्री. मुंडेंनी व्यक्त केला. यावेळी श्री. मुंडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. स्वामी, ए जी कन्स्ट्रक्शन या कंपनीचे अधिकारी, नवनिर्वाचित आमदार संजय दौंड, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिवकन्या शिरसाट, जि. प. सदस्य अजय मुंडे,
माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, प्रा. मधुकर आघाव, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ऍड. गोविंद फड, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ, रामेश्वर मुंडे, सूर्यभान मुंडे , शरद मुंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

अनेक कारणांनी गाजलेला व परळीकरांना गेल्या अनेक दिवसंपासून आंदोलने करायला भाग पाडलेला हा रस्ता गेली तीन वर्षे रखडलेला असून परळी ते अंबेजोगाई प्रवास करणाऱ्या सामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत होता. लोकसभा व विधानसभेच्या निवडणूकीतही हा रस्ता प्रचाराचा भाग बनला होता.

अखेर ना. धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नांना यश आले असून औरंगाबाद स्थित एजी कन्स्ट्रक्शन्स व राजेंद्रसिंग भल्ला इन्फ्रास्ट्रक्चर या कंत्राटदारांची नव्याने नेमणूक करण्यात आली. या कामास पूर्ण होण्यासाठी १८ महिने कालावधी अपेक्षित आहे. १० मीटर रुंदीच्या १८.५ किमी लांबीच्या या रस्त्यासह दुचाकींसाठी दोन्ही बाजूंनी स्वतंत्र १.५ मीटर रस्ता, पथदिवे, गटारे, आवश्यकतेनुसार पाईपलाईन, बसथांबे आदींचेही बांधकाम यामध्ये पूर्ण केले जाणार आहे.

अनेक दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेर परळीकरांना आता दिलासा मिळेल हे आता निश्चित झाले आहे.

COMMENTS