वंचित आघाडीचा उमेदवार ठरवणार धुळे लोकसभेचा निकाल ?

वंचित आघाडीचा उमेदवार ठरवणार धुळे लोकसभेचा निकाल ?

धुळे – धुळे लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार जाहीर झालाय. वंचित बहुजन आघाडीनं या मतदारसंघातून कमाल हाशीम हा मुस्लिम उमेदवार दिला आहे. मुळचे मालेगावचे असलेले हाशीम पुण्यामध्ये उद्योजक आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार आणि संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांचे तिकीट जवळपास निश्चित आहे. तर काँग्रेसमध्ये रोहिदास पाटील आणि डॉ. तुशार शेवाळे यांच्यात चुरस आहे.

2014 च्या मोदी लाट असलेल्या निवडणुकीत या मतदारसंघातून डॉ. सुभाष भामरे हे सुमारे सव्वालाख मतांनी विजयी झाले. इतर लोकसभा मतदारसंघात तुलनेने मोठी आघाडी असताना धुळ्यात मात्र भामरे यांना म्हणावी तशी आघाडी घेता आली नाही. भामरे यांनी काँग्रेसचे अमरिश पटेल यांचा पराभव केला. 2014 मध्ये मोदी लाटेत काँग्रेसला ही जागा गमवाली लागली. आपच्या मुस्लिम उमेदवाराला 10 हजारांपेक्षाही कमी मते मिळाली.

2009 च्या निवडणुकीतही काँग्रेसच्या अमरिश पटेल यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी मात्र त्या निवडणुकीत ते केवळ 20 हजार मतांनी पराभूत झाले होते. भाजपचे प्रताप सोनवणे हे विजयी झाले होते. त्याच निवडुकीत जेडीएसच्या निहाल अहमद यांनी तब्बल 72 हजार 738 मते घेतली होती. थोडक्यात काय तर मालेगावमधील मुस्लिम मतांच्या फाटाफुटीमुळे काँग्रेसला 2009 मध्ये पराभव पत्कारावा लागला होता.

यावेळीही वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार किती मते घेतो त्यावरच धुळे लोकसभेचं गणित अवलंबून आहे. वंचित बहुजन आघाडीच्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्या  मालेगावमध्ये झालेल्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली होती. या मतदारसंघात जवळपास 5 लाखांच्या आसपास मुस्लिम मतदारांची संख्या आहे. तर सुमारे दीड ते दोन लाख दलित मतदारांची संख्या आहे. ही मतेच लोकसभेचा निकाल ठरवणार आहेत.

विद्यमान खासदार डॉ. सुभाष भामरे हे केंद्रात संरक्षण राज्यमंत्री असले तरी मतदारसंघात त्यांच्याविषयी नाराजी आहे. मध्यंतरी भामरे डेंजर झोनमध्ये असल्याच्याही बातम्या भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणाचा हवाला देऊन आल्या होत्या. त्यामुळे डॉ. भामरे सध्या अडचणीत असल्याची चर्चा आहे. मात्र वंचित बहुजन आघाडीच्या तगड्या उमेववारामुळे डॉ. भामरे नाराजीच्या वातावरणातही विजयाची पतका फडकवतील असं बोललं जातंय. थोडक्यात भामरेंवरील नाराजीचा फायदा काँग्रेसचा उमेदवा कसा घेतो. त्याला मुस्लिम दलित मतांमध्ये होणारी फूट टाळण्यात किती यश येतं ते पहावं लागेल.

वंचितचे उमेदवार हाशीम हे आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार आहेत. तसंच भाजप आणि काँग्रेसचे उमेदवार हे मराठा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दलित – मुस्लिम मतांचे मोठे विभाजन झाल्यास त्याचा सरळ सरळ फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे. वंचितचा उमेदवा जिंकू शकतो हे मुस्लिम आणि दलित मतांवर बिंबवल्यास त्या मतांमध्ये मोठी फूट पडू शकते. अर्थातच त्याचा फायदा भाजपाल होऊ शकतो. मात्र या मतफुटीचा फायदा भाजपला होईल आणि वंचितचा उमेदवार जिंकू शकणार नाही असं बिंबवण्यात काँग्रेस यशस्वी झाल्यास मात्र काँग्रेसला विजयाची संधी असू शकते.

COMMENTS