डीजेच्या मुद्यावरुन दीपक पवार यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका !

डीजेच्या मुद्यावरुन दीपक पवार यांची राज ठाकरे यांच्यावर जोरदार टीका !

राज ठाकरे किंवा कुणाही नेत्याने डीजेच्या ढणढणाटाला पाठिंबा देणं हे बेजबाबदारपणाचं लक्षण आहे.खरंतर सगळे डीजे त्यांच्या पुरस्कर्त्या राजकीय नेत्यांच्या दारातच मांडव घालून कायमस्वरूपी लावले पाहिजेत.  म्हणजे त्याच्या त्रासाची कल्पना येईल. आमच्याच उत्सवांना का वगैरे प्रश्न गैरलागू आहेत. सर्व धर्मांच्या सर्व उत्सवांना याबाबतीत नियमावली असली पाहिजे. दरवेळेस न्यायालयांनी कशाला सांगायला पाहिजे? आपल्या घरात लहान मुलं, आजारी माणसं, म्हाताऱ्या व्यक्ती, गरोदर बायका कधीच नव्हत्या व नसणार आहेत का असा प्रश्न या मूर्खपणाचं समर्थन करणाऱ्या सगळ्यांनी स्वत:ला विचारला पाहिजे.

दहीहंडी स्टुलावरून फोडायची का हा प्रश्न मानसिक वय कायम चार वर्षे राहिलेल्या चाहत्याला आवडेल, पण दरवर्षी दहीहंडीला निकामी होणाऱ्या पोरांची जबाबदारी कोण घेणार आहे? राम कदमांना त्यांच्या विधानाबद्दल माफी मागावी लागली. पण राम कदम राज ठाकरेंचे खांदे वापरूनच उन्मादी झाले. तेव्हा अबू आझमीला मारण्यापासून ते २४ तास चालणारं कार्यालय चालवेपर्यंत सगळ्या गोष्टींवर राज ठाकरेंनी त्यांची पाठराखण केली. हे जे सोहळे साजरे करण्याचं वेड आहे ते मराठी माणसांना स्मरणरंजनात आणि शेवटी खड्ड्यात घेऊन जाणार आहे.

उत्सवात नाचणाऱ्या मराठी पोरांची टीशर्ट्स,मंडळांच्या मूर्त्या आणि कार्यक्रमांचे खर्च,दारू पार्ट्या हे सगळं एखादा पुनर्विकासवाला बिल्डर हौसेने करतो. कारण त्याला स्वस्तात माणसं विकत घेता येतात. धर्म,संस्कृतीचा गुलाल अंगावर पडला की मराठी माणसाच्या अंगात येतं. त्याला हवा देणारे लोक गेल्या ५८ वर्षात मराठीवादी म्हणून मिरवताहेत. तुम्ही फक्त डीजेसाठी भांडा, डीजेपुढे लोळा. तुमची संसाधनं वाळूसारखी तुमच्या हातातून निसटून चाललीत हे बघू नका. कारण ते बघितलं तर तुम्हाला सत्य कळण्याचा धोका आहे.

मेंदू गहाण ठेवायला लागण्याच्या मोहिमेत राजीखुशीने सहभागी झालेल्या जनतेला त्या अंमलात ठेवण्यासाठी झिंग लागतेच. पराभूतता, न्यूनगंड आणि सुमारपणा या आपल्या दोषांवर मात करण्यासाठी अंग झाडून उठण्यापेक्षा उठताबसता महाराजांचं नाव घेणं आणि आपली अकार्यक्षमता झाकणं जास्त सोपं आहे.त्यामुळे आपण महाराजांना लाज आणतेो हे आपल्या लक्षात येत नाही. फेसबुक आणि व्हॉट्सअपवर स्वराज्य मिळत नाही आणि दादर ते वांद्रे म्हणजे महाराष्ट्र समजून महाराष्ट्र- महान राष्ट्र होत नाही. तिथे पाहिजे जातीचे. ते प्रतीकात्मकता आणि प्रतिक्रियात्मकतेत हरवलेल्यांचे काम नव्हे.

(सौजन्य – दीपक पवार यांच्या फेसबूक वॉलवरुन)( दीपक पवार हे राज्यशास्त्राचे अभ्यासक, भाषिक चळवळीचे कार्यकर्ते, स्तभंलेखक, आणि राजकीय विश्लेषक म्हणून ओळखले जातात. मुंबई पदवीधर विधान परिषदेची निवडणुकही त्यांनी नुकतीच लढवली होती.)

COMMENTS