बीड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी  ‘दिव्यांगसाथी’ हे नवीन संकेतस्थळ, धनंजय मुंडे यांनी केले उद्घाटन!

बीड जिल्ह्यात दिव्यांगांसाठी ‘दिव्यांगसाथी’ हे नवीन संकेतस्थळ, धनंजय मुंडे यांनी केले उद्घाटन!

बीड – दिव्यांग व्यक्तींची ऑनलाईन नोंदणी, प्रमाणपत्र याचबरोबर दिव्यांगांसाठी असलेल्या विशेष योजनांचा लाभ मिळवून देणे सुकर करण्याच्या उद्देशाने बीड जिल्हा परिषद व समाज कल्याण विभागाच्या वतीने नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘दिव्यांगसाथी’ (divyangsathizpbeed.com) या विशेष संकेतस्थळाचे राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील सर्व गावातील ग्रामसेवकांमार्फत येत्या एक महिन्याच्या आत दिव्यांग व्यक्तींची माहिती भरण्यात येईल, यामध्ये प्रामुख्याने त्यांचे आधार कार्ड, बँक खाते, दिव्यांग प्रमाणपत्र आदी बाबींचा समावेश असेल; जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील; अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी यांनी दिली.

या संकेतस्थळावरून जिल्ह्यातील दिव्यांगांची नोंदणी करून, प्रमाणपत्र प्राप्त लाभार्थ्यांना ३% खर्च योजना, विमा, पेंशन, एसटी-रेल्वे पास इत्यादी योजनांचा लाभ मिळवून देणे, पात्र लाभार्थींना स्वावलंबन कार्ड मिळवून देणे, तपासणी व ऑनलाईन नोंदणी, तसेच आरोग्यविषयक सेवा मिळवून देणे या उद्देशाने जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करण्यात येणार आहे.

अशा प्रकारचे संकेतस्थळ असावे अशी इच्छा धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली होती, त्याला प्रतिसाद देत त्यासाठी सर्वात प्रथम त्यांच्याच बीड जिल्ह्यातील समाज कल्याण च्या व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन हे संकेतस्थळ आकाराला आणले त्याबद्दल धनंजय मुंडे यांनी श्री. येडके व श्री. मडावी यांचे अभिनंदन केले आहे.

दरम्यान जिल्ह्यातील ग्रामीण सह शहरी भागातील सर्व दिव्यांग व्यक्तींची नोंद घ्यावी, सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत विभागाची प्रत्येक योजना पोचवण्यासाठी मदत व्हावी असे चोख नियोजन करून हा उपक्रम राबविण्यात यावा, अशा सूचना यावेळी मुंडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर अशा प्रकारचे संकेत स्थळ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असावे या दृष्टिकोनातून विभागाला सूचना करण्यात येतील अशी माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली.

यावेळी बीडचे आ. संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, शिवाजीराव शिरसाट, अतिरिक्त जिल्हाधिकारी आनंद भंडारी, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजीव येडके, यांसह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

COMMENTS