धनंजय मुंडे व जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली, उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची प्रशासनाने केली राहण्या – जेवणाची सोय!

धनंजय मुंडे व जिल्हाधिकाऱ्यांनी सूत्रे हलवली, उत्तर प्रदेशात अडकलेल्या परळी येथील यात्रेकरूंची प्रशासनाने केली राहण्या – जेवणाची सोय!

परळी – परळी येथील जवळपास १०० यात्रेकरू भागवत कथेसाठी गेलेले उत्तर प्रदेश येथील वृंदावन येथे अडकलेले आहेत. देशभरात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’ च्या परिस्थितीत त्यांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून परत आणणे शक्य नसल्यामुळे आता त्यांची मथुरा येथे राहणे, जेवण व आरोग्यविषयक सोय स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या मार्फत करण्यात येत आहे.

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी तसेच स्वतः मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क साधून याबाबत सविस्तर चर्चा करून हा निर्णय घेतला आहे.

धनंजय मुंडे यांनी मथुरा येथील जिल्हाधिकारी तसेच अडकलेल्या यात्रेकरूंना संपर्क करून परिस्थितीची माहिती घेतली. देशात कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू झालेल्या लॉकडाऊन मुळे शंभर लोकांना तीन राज्यांच्या सीमा ओलांडून स्वगृही आणणे सध्यातरी शक्य होणार नाही, त्यामुळे आहेत तिथचे त्यांची सोय करून त्यांना सुरक्षित ठेवण्यात यावे, तसेच परिस्थिती निवळल्यानंतर त्यांना तातडीने परळीला आणण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

स्वतः पालकमंत्री धनंजय मुंडे तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार हे या अडकलेल्या प्रवाशांशी तसेच तेथील प्रशासनाशी कायम संपर्कात असून त्याठिकाणी त्यांची निवास, भोजन व आरोग्यविषयक सुविधा होतील यासाठी प्रयत्नशील आहेत.

नातेवाईकांना आवाहन

अडकलेल्या या प्रवाशांच्या नातेवाईकांनी त्यांना परत आणावे अशा प्रकारची सोशल मीडिया , मीडिया वरून मागणी केली आहे . मात्र या सर्व प्रवाशांचे वय , करोनाची भीती आणि एकंदर पार्श्वभूमी पाहता त्यांना आत्ता लगेच परत आणणे शक्य नाही मात्र आहे त्या ठिकाणी त्यांची घरच्यासारखी सोय होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामुळे कोणीही नातेवाईकांनी, हितचिंतकांनी घाबरून न जाता सहकार्य करावे असे आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.

आहेत तिथेच सुरक्षित राहा – धनंजय मुंडे यांचे आवाहन

दरम्यान लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातून स्थलांतरित असणारे अनेक लोक विविध ठिकानांवरून संपर्क करत असून, स्वगृही/गावी परतण्याबाबत मदतीची विनंती करत आहेत. शासनाने या भीषण आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून राज्यासह देशभरात लॉकडाऊन केले आहे. या व्हायरसवर ‘सोशल डिस्टनसींग’ हा एकमात्र इलाज सध्यातरी आपल्याकडे आहे.

त्यामुळे आपण जिथे आहोत तिथेच सुरक्षित राहण्याचा पुरेपूर प्रयत्न करावा, शासनाने घालून दिलेले नियम मोडून कुठेही येण्या – जाण्यासाठी प्रयत्न करू नयेत व राज्य शासनाला सहकार्य करावे असे कळकळीचे आवाहन या निमित्ताने मुंडे यांनी केले आहे.

COMMENTS