जिल्हास्तरावरची योजना धनंजय मुंडेंनी पोहचवली तालुक्यावर, शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ !

जिल्हास्तरावरची योजना धनंजय मुंडेंनी पोहचवली तालुक्यावर, शिवभोजन थाळीच्या तीन केंद्रांचा परळीत शुभारंभ !

केवळ पाच रुपये प्रमाणे तीनशे गरजूंना मिळणार 'शिवभोजन'

परळी – महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरू केलेल्या शिवभोजन थाळीला सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी तालुका स्तरावर पोहचवले असून परळी शहरात आज नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते तीन शिवभोजन थाळी केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला.

शिवभोजन योजनेच्या माध्यमातून गरजूंची भूक भागवण्यास मदत होत असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यात ही योजना पोचवणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तसेच परळीत कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याचा माणसही त्यांनी व्यक्त केला आहे.

परळीत सुरू करण्यात आलेल्या या केंद्राद्वारे लॉकडाऊनच्या काळात केवळ पाच रुपये प्रमाणे गरजूंना भोजनाचे डबे पुरवले जाणार असून प्रत्येक केंद्रातून १०० असे एकूण ३०० डबे रोज पुरवले जाणार आहेत.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीने राज्यात शिवभोजन थाळी चा उपक्रम राबविण्यात येत आहे. सुरुवातीला ही योजना जिल्हास्तरावर होती. बीड जिल्ह्यातील हातावर पोट असणाऱ्या नागरिकांची संख्या बघता राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात तालुका स्तरावर ही योजना सुरू करण्याबाबत विनंती केली होती; शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत बीड जिल्ह्यात शिवभोजन थाळी या मध्यान्ह भोजन योजनेची सुरुवात आज परळीतून केली आहे.

यामध्ये वैद्यनाथ मंदिर परिसरातील अन्नपूर्णा चॅरिटेबल ट्रस्ट, कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील स्व. पंडित अण्णा मुंडे शेतकरी भोजनगृह आणि रेल्वे स्थानकासमोरील पंचवटी भोजनालय या तीन ठिकाणी शिवभोजन थाळीला सुरुवात करण्यात आली आहे.

यावेळी उदघाटन किंवा अन्य कोणताही बडेजाव न करण्याच्या सूचना मुंडे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार नगराध्यक्षा सौ. सरोजनी हालगे यांच्या हस्ते गरजूंना थाळीचे प्रत्यक्ष वाटप करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी रा. कॉ. चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हा उपाध्यक्ष सुरेश टाक, माजी उपनगराध्यक्ष अभयकुमार ठक्कर, राजाभैय्या पांडे, शिवसेना तालुकाप्रमुख व्यंकटेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक माणिक भाऊ फड, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष माऊली फड, सचिव बलविर रामदाशी, राजेश विभूते, रमेश चौंडे, अतुल दुबे, अनंत ईंगळे, मनजीत सुगरे, सुरेशनाना फड, अनिल लाहोटी, राकेश चांडक, उमेश टाले, संतोष पंचाक्षरी, वैजनाथ कळसकर, मोहन साखरे, कचरूलाल उपाध्याय, दामजी पटेल, संजय स्वामी, नरेश साखरे, तसेच पत्रकार मोहन व्हावळे, धीरज जंगले, दिलीप बद्दर, महादेव वाघमारे, जयराम गोंडे, रणजित सुगरे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

आणखी तीन केंद्रे व कम्युनिटी किचन लवकरच…

दरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या वतीने परळीत आणखी तीन शिवभोजन केंद्र उभारणे प्रस्तावित असून एक कायमस्वरूपी कम्युनिटी किचन सुरू करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. तर अशा प्रतिकूल परिस्थितीतही गोरगरीब गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळी सुरू केल्याबाबद्दल नागरिकांनी मुंडेंचे आभार मानले आहेत.

COMMENTS