ईडी भाजपचा पोपट : संजय राऊत

ईडी भाजपचा पोपट : संजय राऊत

मुंबई – कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही, आम्ही लॉ मेकर आहोत, मी जर तोंड उघडलं तर केंद्रात हादरे बसतील, तुमची संपत्तीचे आकडे माझ्याकडे, तुमच्या मुलांचे हिशेब माझ्याकडे, मात्र उद्धव साहेबांचा आदेश, बाळासाहेबांची शिकवण, कुटुंबापर्यंत पोहोचायचं नाही, लढाई समोरासमोर करायची. ईडीच्या नोटीसाचा आदर करतो, भले तो भाजपचा पोपट असो, असा टोला शिवेसना खासदार संजय राऊत यांनी लगावला.

पीएमएस बॅंकेच्या घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना रविवारी ईडीकडून नोटीस पाठविण्यात आले होते. यावेळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर हल्ला चढवला. त्यानंतर काही वेळातच मुंबईतील ईडी कार्यालयावर शिवसैनिकांनी भाजपा प्रदेश कार्यालय असा बॅनर झळकावला आहे.

राऊत म्हणाले, आमच्यासाठी ईडी हा महत्त्वाचा विषय नाही. सीबीआय, ईडी किंवा इन्कम टॅक्स असेल, कधी काळी या तिन्ही संस्थांना देशात प्रतिष्ठा होती. एखाद्या गुन्ह्या संदर्भात सीबीआय, ईडी, आयकर विभागाने कारवाई करायची म्हटलं, तर त्यामध्ये काहीतरी गांभीर्य आहे असं वाटत होतं. पण गेल्या काही वर्षापासून ईडीची नोटीस येणं, कारवाई करणे म्हणजे एखाद्या राजकीय पक्षाने आपली भडास काढणं असं लोकांनी गृहित धरलं आहे.

“गेल्या वर्षभरात मी पाहतोय, शरद पवार, प्रफुल्ल पटेल, प्रताप सरनाईक… माझ्या नावाचा तुम्ही कालपासून गजर करत आहात. जे प्रमुख नेते आहेत, जे हे सरकार बनवण्यात आग्रही होते, जे राजकीय दृष्ट्या दबावाला बळी पडत नाहीत, त्यांना अशा नोटीस पाठवल्या जातात. याला फ्रस्टेशन, हतबलता म्हणतात.. राजकारणात समोरासमोर लढण्याची धमक हवी.. छत्रपतींची भूमी आहे, समोरासमोर लढा” असं आवाहनही राऊतांनी केलं.

“मी देवेंद्र फडणवीसांचं ऐतिहासिक विधान ऐकलं, काही केलं नसेल तर घाबरायचं कशाला? नोटीस म्हणजे काय ब्रह्मवाक्य आहे का? मी परत सांगतो, आमच्यातील कुणी काहीही केलं नाही. नोटीस येऊ द्या किंवा नाही येऊ द्या. आम्ही घाबरत नाही, तुम्ही घाबरायला हवं” असा इशाराही संजय राऊतांनी दिला.

COMMENTS