एकनाथ खडसेंना मंत्रिपदाऐवजी देणार भाजपचं प्रदेशाध्यक्षपद ?

एकनाथ खडसेंना मंत्रिपदाऐवजी देणार भाजपचं प्रदेशाध्यक्षपद ?

मुंबई –  भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना राज्य मंत्रिमंडाळतील विस्तारात पुन्हा स्थान देण्याऐवजी त्यांना भाजपचं प्रदेशाध्यक्ष पद दिलं जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला विजयादशमीच्या दिवशी मुहूर्त लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजूनही हिरवा कंदील दिला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे थेट प्रदेशाध्यक्षपदाचीच जबाबदारी खडसे यांच्यावर सोपवली जाण्याची शक्यता आहे. तसेच रावसाहेब दानवे हे मराठा असले तरी बहुजन, ओबीसी समाज एकनाथ खडसेंच्या मागे आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी झाली व शिवसेना, भाजप स्वतंत्र लढले तर खडसेंचे वक्तृत्व व नेतृत्वाचा उपयोग पक्षाला होऊ शकतो त्यामुळे त्यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते असा अंदाज मांडला जात आहे.

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी काल अचानक मुंबईचा दौरा केला. नियोजित मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शहा यांचा मुंबई दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. मुंबईत आल्यानंतर शाह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराच्या दृष्टीने घडामोडींना वेग आला असल्याचं दिसत आहे.

 

COMMENTS