आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा, म्हणजे झालं – एकनाथ खडसे

आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा, म्हणजे झालं – एकनाथ खडसे

मुंबई – भाजपवर नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा सरकारला घरचा आहेर दिला आहे. विधानसभेत आरोग्य विभागाच्या पुरवण्या मागण्यांवरील चर्चेदरम्यान एकनाथ खडसेंनी सरकारवर टीका केली आहे. सिव्हिल हॉस्पिटल वैद्यकीय शिक्षणाकडे ट्रान्सफर केलं असं सांगतात, आता आम्हाला पण कुठेतरी ट्रान्सफर करा म्हणजे झालं, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एकनाथ खडसे यांनी सरकारची फिरकी घेतली असल्याचं दिसत आहे.

दरम्यान यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांना टोला लगावला असून आरोग्य सेवा द्यायची नसेल तर हॉस्पिटलला कुलूप ठोका. समारंभपूर्वक बंद करण्याचा कार्यक्रम करु. नुसती लाखांची आरोग्य शिबिरं घ्यायची आणि उपचारासाठी या मुंबईला असं करुन चालत नाही  असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. जिल्हा ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्याने जनता त्रस्त झाली असून MBBS नसतील, तर BAMS चे डॉक्टर्स द्या, अशी मागणी खडसेंनी केली आहे.

नातेवाईक जेव्हा एखाद्याचा मृतदेह आमदारांच्या दारावर आणून ठेवतात, तेव्हा आम्ही काय करायचं? असा प्रश्न खडसेंनी त्यावेळी उपस्थित केला. डॉक्टर नाहीत, टेक्निशियन नाही, मग नर्सेसला पगार कशाला द्यायचा? असा सवाल खडसेंनी विचारला तसेच जळगाव मेडिकल कॉलेजला एक रुपयाची तरतूद नाही. गेल्या चार दिवसात झालेले दोन मृत्यू डॉक्टरांच्या अभावामुळेच झाले असल्याचा दावाही एकनात खडसेंनी केला आहे.त्यामुळे मला सरकारकडून आजच्या आज उत्तर हवं, अशी भूमिकाही त्यावेळी एकनाथ खडसेंनी घेतली होती.

 

COMMENTS