निवडणूक‍ आयोगामार्फत राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप !

निवडणूक‍ आयोगामार्फत राजकीय पक्षांना प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप !

मुंबई – लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगामार्फत प्रक्षेपण आणि प्रसारण तासांचे वाटप करण्यात आले आहे. आयोगामार्फत 7 राष्ट्रीय आणि 52 राज्यस्तरीय पक्षांसाठी दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रचाराचे तास कसे असतील हे ठरवून देण्यात आले आहेत.

2014 या लोकसभा निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना मिळालेल्या जागांनुसार आयोगाने दूरदर्शन आणि आकाशवाणीसाठी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना वेळ आखून दिला आहे.

राजकीय पक्षांना 520 ते 180 मिनिटांपर्यंतचा अवधी प्रचारासाठी मिळणार

7 राष्ट्रीय पक्षांना प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 600 मिनिटे मिळतील. तर प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 900 मिनिटे मिळतील. 52 राज्यस्तरीय पक्षांना प्रचारासाठी प्रादेशिक वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 1 हजार 800 मिनिटे मिळतील तर राष्ट्रीय वाहिनीवरील प्रक्षेपण आणि प्रसारणासाठी एकूण 520 मिनिटे मिळतील.

राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या राष्ट्रीय आणि प्रादेशिक वाहिनीवर प्रचार करताना त्यांना दिलेला कालावधी लक्षात घ्यावा लागेल. राष्ट्रीय पक्षाला दूरदर्शनवर प्रचारासाठी राष्ट्रीय वाहिनीवर 10 तास टप्प्याटप्प्याने मिळतील तर 15 तास प्रादेशिक वाहिनीवर मिळतील. राज्यस्तरीय पक्षाला प्रादेशिक वाहिनीवर 30 तास प्रचारासाठी मिळतील. राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे 8 तास 40 मिनिटेही प्रचारासाठी मिळतील. राष्ट्रीय पक्षाला आकाशवाणीच्या मुख्य केंद्रावर प्रचारासाठी 10 तास तर प्रादेशिक वाहिनीवर 15 तास मिळतील. तर राज्यस्तरीय पक्षाला आकाशवाणीच्या प्रादेशिक वाहिनीवर 30 तास प्रचारासाठी मिळतील. याशिवाय राज्यस्तरीय पक्षांना प्रादेशिक उपग्रह केंद्राचे 8 तास 40 मिनिटेही प्रचारासाठी मिळतील.

नामनिर्देशनाचा शेवटचा दिवस ते शेवटच्या टप्प्यातील निवडणुका होईपर्यंत पक्षांना दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करता येईल. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यता प्राप्त असलेले पक्ष जेव्हा आपल्या पक्षाचा प्रचार व प्रसार दूरदर्शन किंवा आकाशवाणीवरुन करतील तेव्हा त्यांनी त्या संबंधित माहितीची किंवा भाषणाची एक लिखित प्रत दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्याकडे देणे आवश्यक आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी यांच्यामार्फत ती माहिती पडताळून पाहिली जाईल. या माहितीमध्ये निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांविरुद्ध लिखाण असल्यास त्यातील काही वाक्य, संदर्भ किंवा परिच्छेद वगळावे लागतात.

राष्ट्रीय आणि राजकीय पक्षांनी दूरदर्शन आणि आकाशवाणीवरुन प्रचार करीत असताना प्रसारभारती महामंडळाला त्यांच्या प्रचारासाठी देण्यात आलेला वेळ, प्रचार साहित्य यांचे वेळापत्रक देणे आवश्यक असून त्याबाबत मान्यता घ्यावी लागेल. याशिवाय या पक्षांनी देश, जात-धर्म तसेच न्यायालय किंवा व्यक्तीविरोधात टीका करु नये असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.

COMMENTS