प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 कार्यकर्त्यांवर पंढरपुरात गुन्हे दाखल !

प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 कार्यकर्त्यांवर पंढरपुरात गुन्हे दाखल !

सोलापूर – वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह 1200 कार्यकर्त्यांवर पंढरपुरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. संचारबंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमनातील तरतुदीचे उल्लंघन केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी सोमवारी पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. या आंदोलनाला जवळपास 1200 लोक उपस्थित होते. यानंतर आंबेडकर यांनी आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसह पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करुन दर्शन घेतलं. यावेळी बोलताना त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं होतं.

तसेच प्रकाश आंबेडकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी पंढरपूरमध्ये जवळपास 1100 ते 1200 नागरिकांचा जमाव जमवून, मास्क न घालता, सोशल डिस्टन्सिंग न पाळता संचार बंदी, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियममधील तरतुदींचे उल्लंघन करुन ठिय्या आंदोलन केलं होतं.

त्यामुळे त्यांच्यासह जवळपास 1200 कार्यकर्त्यांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यामध्ये प्रकाश आंबेडकर, आनंद चंदनशिवे, धनराज वंजारी, अरुण महाराज बुरघाटे, माऊली हळणवार, अशोक सोनोने ,रेखा ठाकुर, गणेश महाराज शेटे यांच्यासह 1200 जणांचा समावेश आहे.

COMMENTS