अहमदनगरमधील ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, अजित पवारांची भेट घेऊन पोहचले मातोश्रीवर !

अहमदनगरमधील ते पाच नगरसेवक पुन्हा शिवसेनेत, अजित पवारांची भेट घेऊन पोहचले मातोश्रीवर !

मुंबई – शिवसेनेतून राष्ट्रवादीत गेलेले अहमदनगरमधील पारनेर येथील नगरसेवक पुन्हा मातोश्रीवर दाखल झाले आहेत. या नगरसेवकांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर शिवसेनेत घरवापसी झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीनंतर हे नगरसेवक शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले होते. या भेटीत त्यांनी पुन्हा शिवबंधन हाती बांधले असल्याची माहिती आहे.

दरम्यान पारनेर नगरपंचायतीमधील  शिवसेनेच्या ५ नगरसेवकांनी दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामती इथं राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी हा प्रवेश घडवून आणण्यात पुढाकार घेतला होता. यात नंदा देशमाने, वैशाली औटी, नंदकुमार देशमुख, डॉ. सय्यद, किसन गंधाडे या नगरसेवकांचा समावेश होता.महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये झालेले हे पक्षांतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चांगलेच जिव्हारी लागले होते. त्यांनी अजित पवार यांना आमचे नगरसेवक परत पाठवा, असा निरोप पाठवला होता. त्यानंतर आज अखेर हे नगरसेवक मातोश्रीवर दाखल झाले आहेत.

COMMENTS