अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन !

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचे निधन !

अमेरिका –  अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच. डब्ल्यू. बुश यांचं आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते ९४ वर्षांचे होते.  १९८९ ते १९९३ या कालावधीत ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. अमेरिकेच्या हयात असलेल्या माजी अध्यक्षांपैकी ते सर्वांत वयोवृद्ध होते. जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश हे अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यापूर्वी रॉनल्ड रेगन यांच्या अध्यक्षकाळात ते अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते. १९७६ ते १९७७ या कालावधीत ते सीआयएच्या संचालकपदावरही होते.

जॉर्ज डब्ल्यू बुश हे त्यांचे चिरंजीव आहेत.  जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांच्या पत्नी बारबरा बुश यांचे एप्रिलमध्ये निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांची प्रकृतीही खालावली होती. अखेर शनिवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

दरम्यान १२ जून १९२४ रोजी जॉर्ज हर्बर्ट वॉकर बुश यांचा जन्म झाला. तेल उद्योगात नाव कमावल्यानंतर ते राजकारणाकडे वळले होते. रिपब्लिकन पक्षाचे ते प्रतिनिधी होते. शीतयुद्ध संपुष्टात येत असताना, बर्लिनची भींत पाडल्याची घटना आणि सोव्हिएत युनियनचा पाडाव अशा ऐतिहासिक घटना जागतिक पटलावर घडत असताना ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर होते. मात्र निवडून आल्यानंतर देशात आर्थिक स्तरावरील त्यांची कामगिरी निराशाजनक ठरली आणि शेवटी मतदारांनी चार वर्षांनंतर बिल क्लिंटन यांना पाठिंबा दिला होता.

 

COMMENTS