राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी गुड न्यूज !

राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठी गुड न्यूज !

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील गळतीमुळे राष्ट्रवादीला मोठे धक्के बसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेससाठी एक आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा कायम राहणार आहे.
त्यामुळे गळती लागलेल्या राष्ट्रवादीला काहीसा दिलासा मिळाला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा कायम ठेवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवरून पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्याबाबत निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला नोटीस बजावली होती. परंतु निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून लढवता येणार आहे.

दरम्यान १९९९ साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. त्याच सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाला भरघोस मतदान झाले होते. ‘राष्ट्रवादी’ने काँग्रेससोबत आघाडी करून केंद्र आणि राज्यात सत्ता स्थापन केली होती. २००४ आणि २००९ मध्ये झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही पक्षाने स्वतःचे अस्तित्व कायम राखले होते. प्रत्येक वेळी आठ किंवा नऊ खासदार आणि अन्य राज्यांतील विधानसभा निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’चे आमदार निवडून आल्याने पक्षाला राष्ट्रीय पक्षाची मान्यता मिळाली होती. मात्र, २०१४ आणि २०१९ सालात झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षाची जोरदार पीछेहाट झाली. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कायद्यातील तरतुदीनुसार पक्षाला मतांचा टक्‍का राखता आला नाही. या पार्श्‍वभूमीवर तुमचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून का घेऊ नये, अशी नोटीसच निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला बजावली होती.

परंतु आज निवडणूक आयोगाकडे झालेल्या सुनावणीत राष्ट्रीय पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा दर्जा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादीला राष्ट्रीय पक्ष म्हणून लढवता येणार आहे.

COMMENTS