गुजरातमध्ये पाणीपुरीवर बंदी, आपल्याकडेही करावी का ?

गुजरातमध्ये पाणीपुरीवर बंदी, आपल्याकडेही करावी का ?

बडोदा – गुजरातच्या बडोदा जिल्ह्यात जिल्हा प्रशासानानं पाणीपुरीवर बंदी घातली आहे. पाणीपुरी बनवताना स्वच्छतेचे कोणतेही मापदंड पाळले जात नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. त्यामुळे हे पाऊल उचललं असल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. अर्थात हा निर्णय तात्पुरता असल्याचंही जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. नागरिकांच्या आरोग्याविषयी कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान गुजरातचे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानानी यांनी बडोद्याचा हा निर्णय हळुहुळ राज्यभर लागू केला जाणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

आपल्याकडेही पाणीपुरीची पुरी तयार करताना स्वच्छतेचे मापदंड पाळले जात नसल्याचं वेळोवेळी समोर आलं आहे. विविध टीव्ही चॅनलनी अनेकवेळा याच्या चित्रीकरणासह बातम्या दाखवल्या आहेत. मात्र तात्पुरती मलमपट्टी वगळता पुन्हा पहिले पाडे पंचावन्न असे आपल्याकडे सुरू आहे. अशा बातम्या कितीही आल्या तरीही आपल्याकडे पाणीपुरीवर जागोजागी उड्या पडल्याचं चित्र आपल्याला पहायला मिळतं. यावरुन आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो का असा प्रश्न पडतोय. स्वच्छतेच्या बाबतीत गुजरातसारखी परिस्थिती असेल तर आपल्याकडेही पाणीपुरीवर बंदी घालावी का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

अर्थात बंदी घालून सर्व प्रश्न सुटतात असे नाही. स्वच्छतेचे मापदंड केवळ पाणीपुरीलाच का असाही प्रश्न या निमित्ताने पडतो. इतर खाद्यपदार्थ तयार करताना आणि छोट्या मोठ्या हॉटेलमध्येही स्वच्छतेचे मापदंड पाळले जातात का ? हाही प्रश्न आहेच. त्यामुळे केवळ पाणीपुरीवर बंदी घालून आरोग्याचे प्रश्न संपणार आहेत का ?  स्वच्छतेबाबत लोकांमध्येच जनजागृती करुन आणि पाणीपुरी असो किंवा  इतर छोटेमोठे हॉलेट इथलेही स्वच्छते मापदंड कडक करुन त्याची काटेकोर अंमलबाजवणी केल्याच यातून सुटका होऊ शकेल अशी आशा आहे.

COMMENTS