गुजरातमध्ये खातेवाटपावरुन मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यामध्ये जुंपली, हार्दिक पटेलची उपमुख्यमंत्र्यांना ऑफर !

गुजरातमध्ये खातेवाटपावरुन मुंख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यामध्ये जुंपली, हार्दिक पटेलची उपमुख्यमंत्र्यांना ऑफर !

गुजरात – भाजपमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून खातेवाटपावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली असल्याचं पहावयास मिळालं आहे. यावेळेसच्या निवडणुकीमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला मोठा संघर्ष करावा लागला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या नेतृत्वात कशातरी शंभरच्या आसपास जागा मिळाल्या परंतु आता खातेवाटपावरुन मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले विजय रुपाणी  आणि उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यामध्ये धुसफूस सुरु झाली आहे. अर्थ, शहर विकास आणि पेट्रोलियम ही तीन महत्वाची खाती न मिळाल्याने नितीन पटेल नाराज असल्याचे समजते. नितीन पटेल यांनी यावेळी विजय रुपाणींकडे अर्थ आणि शहर विकास ही दोन खाती मागितली होती अशी माहिती आहे. परंतु ती न दिल्यामुळे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी अजूनही आपल्या खात्याची सूत्र स्वीकारलेली नसून ते अजूनही गांधीनगर सचिवालयाकडे फिरकलेच नसल्याची माहिती आहे.

दरम्या नितीन पटेल यांना उपमख्यमंत्रीपद देऊन सरकारमधील महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशी खंत त्यांच्या निकटवर्तीयांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच ही महत्वाची खाती काढून घेतल्याने मनात असलेली नाराजीची भावना  पटेल यांनी वरिष्ठ नेतृत्वाच्या कानावर घातली असल्याची माहिती आहे. त्यामुळे यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांना देण्यात आले समजते परंतु तरीही नितीन पटेल यांच्या नाराजीची दखल घेतली नाही तर ते राजीनामा देऊ शकतात असे सूत्रांनी माहिती दिली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमधील वादाचा राजकीय फायदा घेण्यासाठी पाटीदार समाजाचा नेता हार्दीक पटेलने आता उडी टाकली आहे. हार्दिक पटेलने थेट नितीन पटेल यांच्यापुढे  ऑफर ठेवली असून भाजपमधून बाहेर पडणार असाल तर तुम्हाला काँग्रेसमध्ये योग्य पद आणि सन्मान देण्याची व्यवस्था करण्यात येईल असं हार्दिकने म्हटलं आहे.

सत्तेत येऊन चार दिवस होतात न होतात तोच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये धुसफूस सुरु असल्यामुळे पाच वर्षांचा राजकीय संसार कसा थाटणार असा प्रश्न आता गुजरातमधील जनतेला पडतोय.

 

 

COMMENTS