ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचं निधन, काँग्रेस परिवारावर शोककळा !

ज्येष्ठ काँग्रेस नेते गुरूदास कामत यांचं निधन, काँग्रेस परिवारावर शोककळा !

दिल्ली – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं आज ह्दयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते.  कामानिमित्त कामत दिल्लीला गेले होते. आज सकाळी त्यांना ह्दयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीनं दिल्लीच्या चाणक्यपुरी इथल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत त्यांनी अखेर श्वास घेतला. मुंबईतील एक मासबेस, अभ्यासु आणि निष्ठावंत काँग्रेस नेते म्हणून कामत यांची ओळख होती. काँग्रेसमधील अनेक पदांवर त्यांनी काम केलं.

अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्षपदही त्यांनी भुषविलं होतं. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. मनमोहनसिंग यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी स्वतंत्र्य प्रभार असलेलं राज्यमंत्रीपदही भूषवलं होतं. काही गोष्टींवर नाराज झाल्यामुळे त्यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. स्पष्टवक्ते म्हणून त्यांची काँग्रेसमध्ये खासियत होती. कामत यांच्या निधनामुळे मुंबई काँग्रेस मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामत यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

मुंबईकरांची नाडी ओळखणारा आणि त्यांचा आवाज संसदेत मांडणारा एक मोठा नेता आपण गमावला आहे या शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

निष्ठावंत व समर्पित नेता काळाच्या पडद्याआड गेला अशी भावना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS