हिंगोली लोकसभा – भाजपमधील नव्या उमेदवाराच्या चर्चेने समिकरणे बदलणार ?

हिंगोली लोकसभा – भाजपमधील नव्या उमेदवाराच्या चर्चेने समिकरणे बदलणार ?

हिंगोली – लोकसभेची निवडणुक 6-7 महिन्यावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्ष त्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. गेल्यावेळी राज्यात लोकसभा निवडणुकीत काँग्रेस भुईसपाट झाली. केवळ 2 जागा काँग्रेसच्या निवडणू आल्या. त्यामध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा समावेश होता. राजीव सातव यांनी ती जागा जिंकून आणली. राजीव सातव आता पुन्हा हिंगोलीमधून भाजपच्या तिकीटावर लढण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून वेगवेगळी नावे घेतली जात आहेत.

भाजपकडून आता नवीन नाव चर्चेत आले आहे. माहूर गडावरील महाराज योगी शाम भारती यांचं नाव चर्चेत आलं आहे. दोन दिवसांपूर्वी महाराजांनी हिंगोलीत भाजप कार्यालयात जाऊन भाजप नेत्यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. तसं पाहिला गेलं तर गेल्या वर्षभरापासून महाराज लोकसभेची चाचपणी करत होते. आता थेट भाजप कार्यालय गाठल्यानं त्यांच्या उमेदवारीबाबत अधिक चर्चा सुरू झाली आहे. भाजपने तिकीट दिल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचंही योगी शाम भारती यांनी म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी मोदींनी आपल्याला धर्मकार्यातून मुक्त होऊन राजकारणात येण्याचं आवाहान केल्याचा दावाही योगी शाम भारती यांनी केला आहे. सध्याचं भाजप सरकार विरोधातील वातावरण आणि विकासाच्या मुद्यावरु पुन्हा निवडणूक लढवण अवघड असल्याची चर्चा भाजपच्या गोटात आहे. त्यामुळे पुन्हा एकदा हिंदुत्वाच कार्ड खेळून निवडणूक जिंकण्याचा प्लॅन असल्याचं भाजपमध्ये बोललं जातंय. त्यामुळेच अशा महाराजांना गळाला लावण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचं बोललं जातंय. आपल्या हातात कधीही न लागलेल्या व ज्या मतदारसंघात अशी देवस्थाने आहेत अशा ठिकाणी हा फंडा लढविण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हिंगोली मतदारसंघात माहूर गड येतो. राज्यातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्णपीठ असलेली ही देवी आहे. राज्यभरातून लाखो भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. ती मते इनकॅश करण्याची भाजपची योजना असल्याचं बोललं जातंय.

भाजपकडून आधीच शिवाजी जाधव लोकसभेसाठी इच्छुक आहेत. जाधव हे सुप्रीम कोर्टात वकील आहेत. गेल्यावेळी ते राष्ट्रवादीकडून इच्छुक होते. मात्र राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला सोडली. त्यामुळे नाराज जाधव यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 2014 मध्ये त्यांनी वसमत विधानसभा भाजपच्या तिकीटावर लढवली. मात्र त्यांचा त्यामध्ये पराभव झाला. मात्र पराभवातून खचत न जाता. त्याच दिवसापासून त्यांनी पुन्हा जोमान तयारी केली आहे. त्याचं फळही त्यांना जिल्हा परिषद निवडणुकीत मिळालं. त्यांनी आता लोकसभेसाठी जोमानं तयारी केली आहे. मात्र योगी शाम भारती यांना तिकीट दिल्यास शिवाजी जाधव काय करणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेकडून अजून उमेदवार निश्चित झालेला नाही. कधी जयप्रकाश मुंदडा निवडणूक लढवणार अशी चर्चा असते. तर कधी सुभाष वानखेडे पुन्हा स्वगृही परतणार अशीही चर्चा असते. त्यामुळे शिवसेनेचा उमेदवार कोण याची उत्सुकता लागली आहे. मात्र योगी शाम भारती यांच्या नव्या चर्चेमुळे मतदारसंघातील समिकरणे चांगलीच बदलण्याची शक्यता आहे.

COMMENTS