होय, ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं !  कसं ? वाचा बातमी

होय, ईव्हीएम हॅक करता येऊ शकतं ! कसं ? वाचा बातमी

मुंबई – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. या निवडणुकांमध्ये  मतदानासाठी ईव्हीएम मशीनचा वापर करु नये अशी मागणी देशातील सर्वच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. ईव्हीएम मशीनऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. ईव्हीएम मशीनविरोधात सर्व विरोधी पक्षांची बैठक देखील होणार आहे. अशातच ईव्हीएम मशीन हॅक केलं जाऊ शकतं अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सरकार आणि निवडणूक आयोगाकडून ईव्हीएम मशीन हॅक केलं जाऊ शकत नाही असे दावे केले जात होते ते फोल ठरले आहेत. भारतातील ईव्हीएम मशीन अगदी सहजपणे हॅक होऊ शकते हे अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे. मिशिगन विद्यापीठातील शास्त्रज्ञ प्रा. जे. ऍलेक्स हॅल्डरसेन यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांच्या पथकाने भारताचे ‘ईव्हीएम’ सहजपणे हॅक करता येते याचे प्रात्यक्षिक करतानाचा एक व्हिडीओच व्हायरल केला आहे. याबाबतची बातमी बिझनेस टुडेनं दिली आहे.

कसं हॅक करता येतं ईव्हीएम मशीन ?

‘ईव्हीएम’ला असणाऱ्या डिस्प्लेसारखाच एक इमिटेशन डिस्प्ले बोर्ड तयार केला. त्या बोर्डखाली एक मायक्रोप्रोसेसर आणि ब्ल्यू टुथ रेडिओ लपवला लपवण्यात आला. ‘ईव्हीएम’मध्ये किती मते पडली याचा आकडा इमिटेशन डिस्प्ले बोर्डावर दिसतो, पण हॅक केल्यामुळे हा मतांचा आकडा हवा तसा बदलता येत असल्याचं प्रा. हॅल्डरसेन यांनी म्हटलं आहे.

तसेच मतदानानंतर ‘ईव्हीएम’ला पेपर आणि व्हॅक्सचे सील लावून सुरक्षित केले जाते असा निवडणूक आयोगाचा दावा केला आहे. परंतु तरीही डुप्लिकेट सील बनवून ईव्हीएमला लावता येते हे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. तसेच ‘ईव्हीएम’ला साधे उपकरण मायक्रोप्रोसेसर जोडल्यानंतर मोबाईलद्वारे पाठविल्या जाणाऱ्या टेक्स्ट मेसेजद्वारे निकाल बदलता येतो असंही या शास्त्रज्ञांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यानंतर 2019 मध्ये लोकसभा आणि महाराष्ट्रासह काही इतर राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडणार. त्यामुळे या निवडणुकांमध्ये आता तरी निवडणूक आयोग मतपत्रिकांचा वापर करणार का? असा सवाल केला जात आहे.

 

COMMENTS