हल्लाबोल मोर्चाला दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांची दांडी !

हल्लाबोल मोर्चाला दिग्गज नेते जयदत्त क्षीरसागर यांची दांडी !

बीड – राष्ट्रवादीच्या मराठवाड्यातील हल्लाबोल यात्रेचा बुधवारचा दुसरा दिवस आहे. या मोर्चाला राज्यभरातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हजेरी लावली आहे. परंतु हा मोर्चा बीडमध्ये पोहचला असता या मतदार संघाचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मात्र या मोर्चाला दांडी मारली असल्याचं पहावयास मिळालं आहे.  क्षीरसागर यांनी मंगळवारी तुळजापूरमध्ये या मोर्चाच्या शुभारंभाला हजेरी लावली होती. त्यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या बाजूला जयदत्त क्षीरसागर बसले होते.

परंतु या शुभारंभानंतर त्यांनी बीडमधील मोर्चाला पाठ फिरवून थेट मुंबई गाठली आहे. त्यामुळे क्षीरसागर यांनी पहिल्या दिवशी मोर्चाला हजेरी लावली परंतु त्यांच्याच मतदारसंघात हा मोर्चा पोहचला असता या  मोर्चाला त्यांनी दांडी मारल्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चेला उधाण आलं आहे. गेली अनेक दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर हे पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचं दिसत आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्याकडून पुतणे संदीप क्षीरसागर यांना बळ दिलं जात असल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी क्षीरसागर यांच्या घरी जाऊन चहापान केलं होतं.

मुख्यमंत्री  आणि त्यांच्या या जवळीकतेमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढविले जात होते. आता स्वतःच्या मतदार संघातच त्यांनी हल्लाबोल यात्रेकडे पाठ फिरवली असल्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांची  पक्ष नेतृत्वावर उघडउघड नाराजी दिसून येत आहे.

COMMENTS