महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का !

महापालिका निवडणुकीच्या तोंडावर  जळगावमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का !

जळगाव – महानगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला जोरदार धक्का बसला आहे. पक्षाचे शहराध्यक्ष निलेश पाटील यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी हातात शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्याशिवाय पक्षाच्या 5 आजी माजी नगरसेवकांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर पक्षाल जबर फटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी पक्षाचे संपर्क नेते दिलीप वळसे पाटील यांनी शहरात घेतलेल्या बैठकीला दोन विद्यमान नगरसेवकांनी दांडी मारली होती. त्यामुळे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात होते अशी चर्चा होती. ती  खरी ठरली.

दरम्यान अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तरी आघाडीची चर्चा अजूनही अधांतरीच आहे. तर दुसरीकडे भाजप खान्देश आघाडीसोबत जाणार की स्वबळावर लढणार याचाही अंतिम निर्णय अजून झालेला नाही. पावसाळी अधिवेशऩामुळे सर्व नेते नागपुरात अडकले आहेत. त्यामुळे आघाडी आणि युतीचा निर्णय अजून झालेला नाही. आघाडी किंवा युती होणार की नाही याबाबत कार्यकर्त्यांमध्ये साशंकता आहे. आघाडी किंवा युती झाली तर आपल्याला तिकीट मिळेल की नाही यावरु कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. भाजप आणि खान्देश विकास आघाडी यांनी एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास मोठ्या प्रमाणात बंडखोरी होऊ शकते. शेवटच्या क्षणी आयाराम गयारामांचा प्रवेश होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही पक्षाने अजून उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही.

दुसरीकडे भाजपनं खान्देश विकास आघाडीकडे 40 जागांची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. खान्देश विकास आघाडीकडे त्याचे 33 नगरसेवक आहेत. तर मनसेचे 12 नगरसेवकही त्यांच्यासोबत आले आहेत. त्यामुळे खान्देश विकास आघाडीकडे एकूण विद्यमान नगरसेवकांची संख्या 45 झाली आहे. अशा स्थितीत 75 जागा असलेल्या महापालिकेत भाजपला 40 जागा कशा मिळणार असा प्रश्न आहे. खान्देश विकास आघाडीतर्फे बहुतेक विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. असे झाल्यास केवळ 30 जागांच्या आसपास जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात. तेवढ्यामध्ये भाजप तयार होणार का हाही प्रश्न आहे. त्यातच एकनाथ खडसे यांचा खान्देश विकास आघाडीसोबत जाण्यात तीव्र विरोध आहे. जळगावचे आमदार सुरेश भोळे हेही जैन यांच्यासोबत आघाडीस इच्छुक नाहीत. त्यामुळे खडसे आणि भोळे यांचा विरोध डावलून युती करण्यात गिरीष महाजन यशस्वी होतात का ते पहावं लागेल.

COMMENTS