भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न, जनसंघर्ष यात्रेत अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल !

भाजप-शिवसेना सरकार हे राज्यावरील सर्वात मोठे विघ्न, जनसंघर्ष यात्रेत अशोक चव्हाण यांचा हल्लाबोल !

यवतमाळ – देशातील आणि राज्यातील भाजप-शिवसेना सरकार हे सर्वात मोठे विघ्न आहे. हे विघ्न दूर करण्यासाठीच काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरु केली असून केंद्रातील व राज्यातील सरकार घालवल्याशिवाय हा जनसंघर्ष थांबणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले आहे.

                काँग्रेस पक्षाच्या राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रेच्या चौथ्या टप्प्याचा प्रारंभ आज यवतमाळ जिल्ह्यातील कळंब येथील चिंतमाणी गणेशाचे दर्शन घेऊन झाला. त्यानंतर यवतमाळ शहरातील विराट जनसघंर्ष सभेला मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आ. नसीम खान, वसंत पुरके, शिवाजीराव मोघे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, आ. हरिभाऊ राठोड, आ. वजाहत मिर्झा, माजी आ. वामनराव कासावार, आशिष देशमुख, विजयराव खडसे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, सरचिटणीस प्रकाश सोनावणे, रामकिशन ओझा, मुनाफ हकीम, अनंतराव घारड, डॉ. नदीम, राहुल ठाकरे, प्रदेश काँग्रेसचे सचिव शाह आलम यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                  यावेळी बोलताना खा. अशोक चव्हाण यांनी भाजप शिवसेना सरकारवर सडकून टीका केली ते म्हणाले की गेल्या साडेचार वर्षात भाजप शिवसेनेचे सरकार एकही प्रश्न सोडवू शकले नाही. राज्यात सतरा हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. स्वतःचे सरण रचून शेतकरी आत्महत्या करित आहेत. पण सरकार आत्महत्या थांबवण्यासाठी काहीच प्रयत्न करत नाही. त्यामुळे राज्यातले सरकार नेमके कोणत्या कामात व्यस्त आहे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.  काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात देशात विकासात, उद्योग धंद्यात प्रथम क्रमांकावर असणारा माहाराष्ट्र फडणवीसांच्या काळात शेतकरी आत्महत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर गेला आहे.

                        भाजपचे नेते पंतप्रधान मोदी विष्णूचा अवतार असल्याचे म्हणतात तर राज्यातले एक मंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दैवी शक्ती प्राप्त आहे असे सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे फडणवीस यांच्याकडे दैवी शक्ती असेल तर त्यांच्या कार्यकाळात इतक्या शेतक-यांनी आत्महत्या का केल्या? राज्यात दुष्काळ कसा पडला? असे प्रश्न उपस्थित करून भाजपवाले देव नाही तर दानव आहेत असे खा. चव्हाण म्हणाले.  भाजपचे नेते होर्डिंग बॅनर लावून मराठा आरक्षणाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आरक्षणाचे श्रेय समस्त समाजाचे आहे. मराठा आरक्षण दिले म्हणून ढोल बडवणा-यांनी मुस्लीम व धनगर आरक्षणाचे काय झाले? ते सांगावे असे खा. चव्हाण म्हणाले.

                           यवतमाळ जिल्ह्यावर भाजप शिवसेना सरकारने अन्याय आले आपल्या राजकीय फायद्यासाठी भाजपने गुन्हेगारांना अभय दिल्याने यवतमाळ शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. या सरकारच्या काळात यवतमाळ जिल्ह्यात एकही नविन उद्योग आला नाही. एकाही तरूणाला रोजगार मिळाला नाही.  नोक-या मागणा-या तरूणांना पंतप्रधान पकोडे विकायला सांगत आहेत.  काल पोहरादेवी येथे येऊन मुख्यमंत्री शंभर कोटी रूपये देऊ असे आश्वासन देऊन गेले मात्र दोन दिवसांपूर्वी ते साईबाबा संस्थानचे ५०० कोटी रूपये घेऊन गेले. हे देवाच्या कामासाठी पैसे देणारे नाहीत तर देवाचे पैसे घेऊन जाणारे आहेत. गेल्या साडेचार वर्षात सांगण्यासारखे एकही काम केले नाही त्यामुळे भाजप शिवसेनेवाले आता मतांसाठी रामाचे नाव घेत आहेत असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

                            या सभेला मार्गदर्शन करताना विधानपरिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे म्हणाले की, विदर्भातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे पण सरकारने शेतक-यांना वा-यावर सोडले आहे. कर्जमाफी मिळाली नाही. कापूस, सोयाबीन, तूरीला भाव नाही. सरकारी खरेदी सुरु नाही.  गेल्यावर्षी खरेदी केलेल्या शेतीमालाचे पैसे अद्याप शेतक-यांना दिले नाहीत. पंतप्रधान पीक विमा योजनेतून शेतक-यांची लूट केली जात असून ही योजना शेतक-यांच्या नाही तर कंपन्यांच्या फायद्याची आहे. विदर्भाच्या अनेक भागात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. सरकारने तात्काळ विदर्भात दुष्काळ जाहीर करून शेतक-यांना मदत करावी असे ठाकरे म्हणाले.

                                      माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांनी या सभेला मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारचा जोरदार समार घेतला. ते म्हणाले की मोदी आणि फडणवीस हुकुमशाही पद्धतीने कारभार करत आहेत. यांच्या हातात सत्तेच्या गाडीचा सत्तेचा एक्सेलेटर आहे पण या सत्तेच्या गाडीचा ब्रेक मात्र जनतेच्या हाती आहे. आगामी निवडणुकांमध्ये जनता हाताच्या पंजासमोरील बटन दाबून भाजपला ब्रेक लावेल असे मुत्तेमवार म्हणाले. या जाहीर सभेत विविध पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

COMMENTS