बाळासाहेबांचे रक्त असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा – जयंत पाटील

बाळासाहेबांचे रक्त असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवा – जयंत पाटील

रायगड – एकीकडे भाजपाच्याविरोधात बोलायचे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची एका हॉटेलमध्ये भेट घ्यायची असा प्रकार सुरु आहे. उध्दव ठाकरे यांच्यात बाळासाहेबांचे रक्त असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी असं आव्हान राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केलं आहे. महाडच्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

दरम्यान आता लाट वगैरे काही राहिलेले नाही, उलट आता यांची वाट लागलेली आहे , आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेल्याचा आरोपही जयंत पाटील यांनी सरकारवर केला आहे.भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्ष सोबत आल्याशिवाय राहणार नाही हे सत्य आहे, त्यादृष्टीने तयारी सुरु असून भाजपा सरकारचा शेवट केल्याशिवाय ही परिवर्तन यात्रा संपवणार नाही असा निर्धारही आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

हा देश व राज्य भाजपा सरकारच्या कचाट्यातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आर्शिवाद घेत, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेवून आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन राष्ट्रवादीने ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु केल्याचेही यावेळी जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

COMMENTS