शिवसेना आमदारांच्या चेहऱ्यावर संताप आणि नाराजी आहे – जयंत पाटील

शिवसेना आमदारांच्या चेहऱ्यावर संताप आणि नाराजी आहे – जयंत पाटील

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी विधानसभेत भाजपा, शिवसेना आमदारांना शाब्दिक चिमटे काढले आहेत. शिवसेनेतील निष्ठावानांना संधी कधी मिळणार. सुनील प्रभू विधानसभेत एवढं बोलतात पण त्यांना पक्षाने मंत्री केलं नाही. कोल्हापूरने शिवसेनेला भरभरून आमदार दिले, तिथला अर्धा मंत्री तरी करायला हवा होता.मंत्री कोण झाले तर दोन वर्षांपूर्वी विधानपरिषदेत निवडून आलेले तानाजी सावंत. त्यामुळे शिवसेना आमदारांच्या चेहऱ्यावर संताप आणि नाराजी आहे. कुठल्याच आमदाराला माहित नाही सावंत मंत्री झाले कसे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला आहे.

तसेच शिवसेनेच्या सगळ्या आमदारांनी आता संशोधन सुरू केलं आहे. दोन वर्षात तानाजी सावंत यांनी मातोश्रीसाठी असं काय केलं की निष्ठावान आमदारांना डावलून त्यांना मंत्री केलं. त्यांनी असा कोणता गड जिंकून दिलाय. जयदत्त क्षीरसागर आमच्याकडे होते तेव्हा शिवसेनेवर बोलायचे. त्यांना शिवसेनेत जायचं होतं म्हणून ते शिवसेनेवर बोलत होते हे आता लक्षात आलं असल्याचा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला आहे.

दरम्यान यावेळी राधाकृष्ण विखेंनाही जयंत पाटील यांनी टोला लगावला आहे. विरोधात असताना विखेंनी केलेल्या भाषणांचा मुख्यमंत्र्यांनी आदर्श घ्यावा. विखेंबाबत मी मागचं काहीच काढणार नाही, आज सकाळचेच सांगतो. विजय वड्डेटीवर मला सकाळी विचारत होते की मी विरोधी पक्षनेता कधी होणार. मी वडेट्टीवारांना सांगितले तुम्ही जोपर्यंत मुख्यमंत्र्यांच्या सूचना ऐकत नाही, सल्ला घेत नाही तोपर्यंत तुम्ही विरोधी पक्षनेते होत नाही असा टोला त्यांनी विखेंना लगावला आहे.

तसेच मुुख्यमंत्र्यांनी चार आदिवासी आणि मागासवर्गीय मंत्र्यांना काढलं. मात्र घेताना केवळ दोन घेतले. मार्च महिन्यात प्रकाश मेहतांबाबतचा लोकायुक्तांचा अहवाल मुुख्यमंत्र्यांकडे आला होता. तरीही साडेचार महिने त्यांना मंत्रीपदावर ठेवलं.

तसेच भाजपामध्ये अनेक निष्ठावान आहेत.
चैनसुख संचेती, सरदार तारासिंह, राजेंद्र पटणी आहेत. मंगलप्रभात लोढांनी काय कमी केलंय की त्यांना तुम्ही मंत्री केलं नाही. सगळ्यांचं जाऊ द्या राम कदमांना मंत्री करायचं होतं, त्यांनी कुणालाही उचलून आणलं असतं असा टोलाही यावेळी जयंत पाटील यांनी राम कदम यांना लगावला आहे.

COMMENTS