राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांची भाजपवर जोरदार टीका!

राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर जयसिंगराव गायकवाड यांची भाजपवर जोरदार टीका!

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत भाजपचे जेष्ठ नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश झाला. यावेळी गायकवाड यांनी भाजपवर जोरजार टीका केली. भाजपात कामाची कदर नाही, कौतुक नाही. चांगल्या कार्यकर्त्यांचे वाळवंट करण्याचे काम भाजपने केल्याचा आरोप जयसिंगराव गायकवाड यांनी बोलताना केला.

जिथे कोंडमारा होतोय त्या पक्षात रहायचं नाही ठरवलं आणि आता राष्ट्रवादीत प्रवेश करुन मोकळा श्वास घेत असल्याचेही जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले. सतीश चव्हाण यांना साथ देवून रेकॉर्ड ब्रेक मतदान मिळवून देणार आहे. जी जबाबदारी द्याल ती प्रामाणिकपणे पार पाडेन. आता फक्त राष्ट्रवादी काँग्रेस असणार आहे असे प्रवेश करताना जयसिंगराव गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे जयसिंगराव गायकवाड यांनी जाहीर केले. बीडमधील माजी खासदार आणि भाजपचे नेते जयसिंगराव गायकवाड यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्वागत केले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक,राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार संग्राम जगताप, आमदार अतुल बेनके, आमदार बाबाजानी दुर्रानी,प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, बीडचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे, मुख्य प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, क्लाईड क्रास्टो आदी उपस्थित होते.

COMMENTS