डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असणार्‍या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा – जितेंद्र आव्हाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असणार्‍या बीडीडी चाळीचे राष्ट्रीय स्मारकात रुपांतर करा – जितेंद्र आव्हाड

मुंबई – लंडनमध्ये ज्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केले. ते घर आपण विकत घेतले आहे. मात्र, या देशातील गोरगरीबांना त्या स्मारकाला भेट देणे शक्य आहे का? त्यामुळे ज्या बीडीडी चाळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली; त्या बीडीडी चाळीची इमारत ताब्यात घेऊन तेथे जागतिक स्तरावरील राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आ. डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

डॉ. आव्हाड यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बालपण वरळीमध्ये गेले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील 22 वर्षे वरळीमधील बीडीडी चाळीत काढली. आजही तीच खोली, ज्या खोलीत त्यांनी अभ्यास केला. ज्यामध्ये ते लहानाचे मोठे झाले. ज्या इमारतीमध्ये ते खेळले; ती इमारत आजही तशीच्या तशी उभी आहे. याच खोलीमध्ये शाहू महाराज त्यांना भेटायला आले होते. अन् बाबासाहेबांची हुशारी – विद्वत्ता पाहून त्यांना शिकण्यासाठी अमेरिका-लंडनला पाठवले होते. ही जी खोली आहे. त्या खोलीचे आणि इमारतीचे राष्ट्रीय स्मारक करण्यात यावे, अशी मागणी या सरकारकडे करीत आहे.

लंडनमधील एका घरामध्ये बाबासाहेबांनी काही काळ वास्तव्य केल्यानंतर ते घर आपण विकत घेतले. कोणता गरीब माणूस लंडनला जाऊ शकतो? जी बीडीडी चाळ गरीबांची चाळ म्हणून ओळखली जाते. त्या चाळीमध्ये बाबासाहेब मोठे झाले. तिथे त्यांच्या हुशारीची, त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांच्या बुद्धीमत्तेची ओळख समाजाला झाली. ती खोली सरकारने ताब्यात घेऊन त्याचे उत्कृष्ठ राष्ट्रीय स्मारकामध्ये रुपांतर केले पाहिजे.

जगामध्ये वर्णद्वेष, जातीद्वेष- धर्मद्वेष याच्याविरोधात काम केलेले जेवढे महामानव आहेत; त्या सर्वांचा लढा आणि त्यांचे कार्य बीडीडी चाळीच्या इमारतीमध्ये सामावता येईल. म्हणून या सरकारने या बीडीडी चाळीत जागतिक दर्जाचे स्मारक उभारावे; जेणेकरुन सर्वसामान्य समाजाला येथे नतमस्तक होता येईल, असे डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे.

COMMENTS