करमाळ्यात विधानसभेला नवी समिकरणे , ”या” तीन नेत्यांमध्ये होणार जोरदार लढत ?

करमाळ्यात विधानसभेला नवी समिकरणे , ”या” तीन नेत्यांमध्ये होणार जोरदार लढत ?

सोलापूर – सध्याच्या राजकारणात कोण कुठल्या पक्षात असेल आणि पुढच्या दिवशी कुठल्या पक्षात असेल याचा नेम नाही. आता करमाळ्याचं पहा. राष्ट्रवादीशी फारकत घेऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झालेले संजय मामा शिंदे लोकसभेला माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार झाले. त्यावेळी मामा लोकसभेत आणि दिदी विधानसभेला अशी करमाळ्यात घोषणाही देण्यात आली. मात्र संजय शिंदे यांचा पराभव झाला आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील समिकरणेच बदलून गेली.
             लोकसभेला पराभव झाला असला तरी बागल आणि शिंदे गट एकत्र असल्यामुळे संजय शिंदे यांना करमाळ्यातून तब्बल ३० हजारांचं मताधिक्य होतं. मात्र लोकसभेला पराभव झाल्यामुळे संजय शिंदे यांनी पुन्हा करमाळा विधानसभेला चाचपणी सुरू केली. दोन तीन दिवसांपूर्वी त्यांनी आणि त्यांचे बंधू माढाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. निमित्त पुरग्रस्तांच्या मदतीचं असलं तरी ते शिंदे बंधू भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली.
             ती चर्चा शमते न शमते तोच आता रश्मी बागल याच शिवेसनेत जाणार असल्याची जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे. त्यांचे समर्थक तर रश्मी दिदि शिवसेनेत जाणार असे छातीठोकपणे सांगू लागले आहेत. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकारातून बागल यांचा शिवसेना प्रवेश होत आहे. बागल यांनी पक्षबदलाबाबत चर्चा करण्यासाठी सोमवारी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली आहे. विद्यमान आमदार नारायण पाटील यांना डावलून रश्मी बागल यांना उमेदवारी देण्याचे संकेत शिवसेनेनं दिले आहेत.
               असं झाल्यास रश्मी बागल या शिवेसनेच्या उमेदवार ठरु शकतात. तर संजय शिंदे हे करमाळा विधानसभेलाही राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ठरु शकतात. तर विद्यमान आमदार नारायण पाटील हे बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार ठरु शकतात. त्यामुळे या तीन नेत्यांमध्ये विधानसभेला जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

COMMENTS